Monday, 27 January 2025

शालेय विद्यार्थ्यांनी केला देशप्रेम व संविधान जागृतीचा जागर प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 



          नागपूर, दि. 26 :  एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीते, नाटिका आणि संविधानाचे महत्त्व पटवून देणाऱ्या दमदार प्रस्तुतीने प्रजासत्ताक दिनाची सायंकाळ देशभक्तीमय झाली. औचित्य ठरले जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने काटोल रोड वरील जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे. 

            जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिध्देश्वर काळुसे यांच्या हस्ते या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.



            नगरपरिषद शाळा कळमेश्वरच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या 'या देशाची शान आणि भारतीयांचा प्राण आमचे संविधान...' या संविधान गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याचं शाळेच्या विद्यार्थ्यांनी 'आम्ही भारताचे लोक...' हे भारतीय राज्यघटना व त्याचे देश विकासातील महत्व विशद करणारे समूह नृत्य सादर केले. या दोन्ही प्रस्तुतींनी उपस्थितांची मन जिंकली.

            जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय अंबाझरीच्या विद्यार्थ्यांनी 'आम्ही जातीचे शेतकरी, खातो कष्टाची भाकरी..' हे कृषी क्षेत्राचे महत्त्व सांगणारे शेतकरी  गीत सादर केले. याच विद्यालयाने 'गर्जा महाराष्ट्र माझा' आणि 'वंदे मातरम' या गीतांवर नृत्य सादर केले.



            लावा येथील न्यू स्टार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासी गेलेले थोर क्रांतिकारक राजगुरू, भगतसिंह आणि सुखदेव यांच्या जीवनावरील चित्तथरारक व देशप्रेमाने ओतप्रोत संगीत नाटिका सादर केली. नागपूर शहर व ग्रामीण भागातील मनपा, जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये बहारदार प्रस्तुती दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाचपावली येथील एससीएस गर्ल्स ज्युनिअर कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख शालिनी तेलरांधे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच प्रगती शाळांना 2024-25 चे पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

 

00000

 

--


No comments:

Post a Comment