नागपूर,
दि. २७ : विभागीय आयुक्त कार्यालयात आज विविध स्पर्धांचे आयोजन करून मराठी भाषा पंधरवाडा
साजरा झाला. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात
सहभागी झाले.
आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन
अपर आयुक्त सामान्य प्रशासन प्रदीप कुलकर्णी
यांच्या हस्ते आणि प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे यांच्या प्रमुख
उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या संयोजक तथा सहायक आयुक्त भूसुधार, शिल्पा सोनुले, तहसीलदार
संदीप माकोडे, स्पर्धेचे परीक्षक अध्यापक महाविद्यालयाचे
प्रा. डॉ. शैलेश गायकवाड आणि वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या प्रा. पल्लवी कर्वे
यावेळी उपस्थित होत्या.
श्री. प्रदिप कुलकर्णी आणि दिपाली मोतीयेळे यांनी मराठी
भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठीतील विविध भाषा व्यवहार आणि मराठीच्या संवर्धनासाठी
आवश्यक प्रयत्न याबाबत विचार मांडले.
मराठी भाषेच्या महत्वावर आधारित निबंध लेखन, प्रशासकीय
व न्यायालयीन शब्दांवरील प्रश्न मंजुषा, शुद्ध लेखन आणि कविता वाचन स्पर्धा यावेळी
घेण्यात आल्या. विभागीय आयुक्तालयातील विविध
विभाग, लेखा व कोषागारे, नागरी हक्क संरक्षण, पोलीस, वने, सार्वजनिक बांधकाम आदी विभागातील
अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र
गीताने झाली. संदीप माकोडे यांनी सूत्रसंचालन केले तर शिल्पा सोनुले यांनी आभार मानले.
उद्या २८ जानेवारी रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असून
बक्षीस वितरण होईल. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या महाराष्ट्र शासनाच्या मुख्य धोरणानुसार
शासकीय कार्यालयांमध्ये १४ ते २८ जानेवारी दरम्यान दरवर्षी मराठी भाषा पंधरवाडा साजरा
करण्यात येतो.
०००००
No comments:
Post a Comment