हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश यांचा भावपूर्ण सत्कार
कवी
सुरेश भट सभागृहात आयोजित या भावपूर्ण सत्कार सोहळयाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता होते तर व्यासपीठावर श्रीमती तेजस्वीनीताई गवई, मातोश्री
श्रीमती कमलताई गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, न्यायमूर्ती
अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती
नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, भारताचे महाअधिवक्ता तुषार मेहता, महाराष्ट्राचे
महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे, सचिव
ॲड. अतुल जलतारे यावेळी उपस्थित होते.
हायकोर्ट
बार असोसिएशनतर्फे होत असलेला गौरव अत्यंत भावपूर्ण असल्याचे सांगतांना सरन्यायाधीश
भूषण गवई म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शानुसार काम करण्याचा
सातत्याने प्रयत्न राहीला आहे. सामान्य व गरीबांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले
आहे. वडीलांच्या सूचनेनुसार या क्षेत्रात आलो असून आईच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याला
आकार मिळाला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवितांना कुणाचेही नुकसान होणार नाही या
वडीलांच्या शिकवणीच्या आधारावरच मार्गक्रमण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
वकील
व न्यायमूर्ती ही दोन्ही पदे समाजाच्या सेवेसाठी आहे. मला मिळालेली संधी ही सामान्य
जनता यांच्यासाठी आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती उदय लळीत व न्यायमूर्ती संजीव
खन्ना आदर्श आहे. नागपूर बार असोसिएशनमध्ये माजी सरन्यायाधीश भाऊसाहेब बोबडे व वी.आर.
मनोहर यांच्या मार्गदर्शनानुसार वकिलीला सुरुवात केली. याच काळात शासकीय अभियोक्ता
म्हणून वैद्यकीय प्रवेश, वन विभागामुळे जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या
संरक्षणासाठी करावयाच्या प्रश्नासंदर्भात भूमिका मांडून प्रश्न सुटू शकला याचे समाधान
असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, झुडपी जंगालामुळे हजारो नागरिकांचा प्रलंबित
प्रश्न सोडविणे शक्य झाले.
वेगवेगळया
प्रकरणात निकाल देतांना सामाजिक व आर्थिक प्रकरणांची सोडवणूक करण्याची संधी मिळाली
असून गोंदिया, चंद्रपूर या भागात वैद्यकीय
महाविद्यालय, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पामुळे विदर्भातील सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी
मदत आदी विविध सामाजिक प्रश्नाचे सोडवणूक करणे शक्य झाले. न्यायपालिकेतील न्यायमूर्ती
व इतर अधिकाऱ्यांच्या वेतन व पेंशनचा प्रश्न तसेच वन रँक वन पेंशन आदी प्रश्नांचे सोडवणूक
करतांना न्यायदानामध्ये पारदर्शकता आणण्यालाही प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हायकोर्ट बार असोसिएशनचा सदस्य म्हणून केलेल्या उपक्रमासंदर्भात यावेळी सरन्यायाधीश
भूषण गवई गौरवपूर्ण उल्लेख केला.
प्रमुख
पाहुणे म्हणून बोलतांना माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी
दिलेले निकाल अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शक आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या वैशिष्ट्यामुळे
प्रत्येक निकालामध्ये स्पष्टता आहे. या क्षेत्रातील त्यांची दूरदृष्टी व सकारात्मकता
यामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
यावेळी
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या
कार्याचा गौरव करतांना ते खरे अर्थाने भूषण आहे. सामान्य जनतेला सूलभपणे न्याय मिळावा
यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. तसेच न्याय व्यवस्थेतील विविध सुधारणा संदर्भात
विविध सूचना केल्यात.
यावेळी
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, बॉम्बे
हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती
अनिल किलोर, भारताचे महाअधिवक्ता तुषार मेहता, महाराष्ट्राचे महाअधिवक्ता डॉ. बिरेंद्र
सराफ, अधिवक्ता फिरदोस मिर्झा, एस.के. मिश्रा, आनंद जयस्वाल, ज्येष्ठ अधिवक्ता सुनिल
मनोहर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष
ॲड. अतुल पांडे यांनी केले. यावेळी विविध संस्था व संघटनांच्या वतीने सरन्यायाधीश भूषण
गवई यांचा सत्कार करण्यात आला.
*****
No comments:
Post a Comment