नागपूर, दि. १७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून येथील मुख्यमंत्री सचिवालयात (हैद्राबाद हाऊस) सुरु झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून जानेवारी ते जून २०२५ दरम्यान विदर्भातील गरजु व पात्र रुग्णांना गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी एकूण १ हजार ११३ गरजुंना ९ कोटी ६२ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले आहे. उमरेड येथे एमएमपी इंडस्ट्रीज लि. मधील दुर्घटनेत मृत झालेल्या ७ कामगारांच्या परिवारालाही या कक्षाद्वारे प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात आली.
सहाय्यता निधी प्राप्त करण्याकरिता संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबई येथे अर्ज सादर करण्यास जावे लागत असे त्यात बऱ्याच अडचणीही येत असत. ही अडचण दूर करून विदर्भातील गोर गरीब रुग्णांना नागपुरातच हे अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून २०१५ मध्ये हैद्राबाद हाऊस येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना झाली. हा कक्ष कार्यान्वित झाल्यापासून नागपूरसह विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली,अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यातील गरजु व पात्र रुग्णांना गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य मिळवण्याकरिता येतात व त्यांना कक्षाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येते.
जानेवारी २०१७ पासून या कक्षातून प्रत्यक्ष रुग्णांना उपचारासाठी निधी उपलब्ध होत आहे. नागपुरात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमधील गोर गरीब रुग्णांना उपचार व त्यासाठी शासनाच्या अर्थ सहाय्य मिळविण्यासाठी हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष हा मोठा आधार ठरला आहे. या कक्षाद्वारे मंजूर अर्थसहाय्याची रक्कम नागपूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित रूग्णालयांना वितरीत करण्यात येते.
जानेवारी ते जून २०२५पर्यंत ९ कोटींची मदत
हैद्राबाद हाऊस स्थित मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे जानेवारी ते जून २०२५ एकूण १ हजार ११३ गरजुंना ९ कोटी ६२ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात २६३ रूग्णांना २ कोटी ३७ लाख ५५ हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले. तर फेब्रुवारी महिन्यात १४१ रूग्णांना १ कोटी १४ लाख ८७ हजारांचे, मार्च महिन्यात १७५ रूग्णांना १ कोटी ४८ लाख ८६ हजार ५००, एप्रिल महिन्यात १८२ रूग्णांना १ कोटी ५६ लाख ४ हजारांचे, मे महिन्यात १४७ रूग्णांना १ कोटी २३ लाख ६५ हजार आणि जून महिन्यात २०५ रूग्णांना १ कोटी ८१ लाख ४५ हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले.
७ मृत कामगारांच्या परिवारांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात ११ एप्रिल २०२५ रोजी एमएमपी इंडस्ट्रीज लि. येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये ७ कामगारांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ७ लाखांप्रमाणे ३५ लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले.
अर्थसहाय्य मंजूर होण्यासाठी कार्यकारीणी समिती
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे (विदर्भ) प्रमुख व सदस्य सचिव म्हणून डॉ. सागर पांडे कार्यरत आहेत. मुंबई मंत्रालय येथे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक हे राज्यातील सर्व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा समन्वय पाहतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकरिता प्राप्त अर्जांची छाननी करून अर्थसहाय्य मंजूर करण्याकरिता कार्यकारीणी समिती गठीत करण्यात आली असून विभागीय आयुक्त, उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्य चिकित्सक या समितीचे सदस्य आहे तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे (विदर्भ) प्रमुख हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
००००
No comments:
Post a Comment