Sunday, 11 September 2016

शेतक-यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी जास्तीत जास्त विक्री केंद्र निर्माण करावीत -अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल


आठवडी बाजाराची संकल्पना सर्वत्र राबवा

नागपूर दि. 9 :-  शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ  उपलब्ध करुन देण्यासाठी शहरात जास्तीत जास्त ठिकाणी विक्री केंद्रे तयार करावीत.तसेच आठवडी बाजाराच्या संकल्पनेनुसार शेतक-यांनी शेतात स्वत: पिकविलेला मालच आठवडी बाजारात विक्रीस आणावा. जेणेकरुन ग्राहकांचा विश्वास संपादन करता येईल आणि शेतक-यांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ प्राप्त होईल,असे मत सचिव नियोजन व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी  आज व्यक्त केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज नियोजन व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव  सुनिल पोरवाल यांनी शेतकरी आठवडी बाजार याबाबत आढावा बैठक घेतली . त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार , मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्र सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे , विभागीय कृषी सह संचालक विजय घावटे, , पणन संचालक तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे मंडळाचे संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, विभागीय सह निबंधक प्रवीण वानखेडे तसेच विभागातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष ,सदस्य, शेतकरी गट  आदी उपस्थित होते.
अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शेतकरी गट तसेच शेतक-यांच्या उत्पादक कंपन्यांनी केवळ अनुदानावर अवलंबून न राहता उत्तम दर्जाचा माल बाजारपेठेत विक्रीस आणावा .शेतक-यांनी शेतमालाची प्रतवारी आणि गुणवत्तेकडे लक्ष पुरवावे. आठवडी बाजारासाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे जागेचा प्रश्न. यासाठी मनपा आयुक्त, नासुप्र सभापती आणि जिल्हाधिकारी हे कृषी पणन मंडळास जागा उपलब्ध करुन देतील, असे निर्देशही त्यांनी सबंधितांना दिले. शेतकरी गट तसेच शेतक-यांच्या उत्पादक कंपन्यांना इनपुट आणि आऊटपुट परवाना उपलब्ध करुन देण्यासाठी पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांना निर्देश दिले.
विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, बाजारपेठेत ज्या विक्रेत्यांच्या मालाची गुणवत्ता चांगली असेल तोच विक्रेता ग्राहकांचा विश्वास संपादन करु शकेल. ग्राहकांच्या दृष्टीने गुणवत्ता महत्वपूर्ण आहे .शेतक-यांनी शेतमालाची प्रतवारी आणि लक्ष पुरवावे . शेतकरी गटांनी या कामामध्ये महिला वर्गाला प्राधान्य दयावे. तसेच रामदेवबाबा यांचा मेगा फूड पार्क लवकरच नागपूरला सुरु होत आहे.याचाही शेतक-यांना निश्चितच फायदा होईल.असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियम 1963 मध्ये सुधारणा केल्या असून त्या अंतर्गत शेतक-यांना आपला कृषी माल थेट ग्राहकांना विक्री करण्याकरिता अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. शेतक-यांनी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री केल्याने नाशवंत मालाचा दर्जा टिकून राहतो व मूल्य साखळीतील मध्यस्थांनी संख्या कमी झाल्यामुळे शेतक-यांना परंपरागत बाजार पध्दतीत मिळणा-या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त होते तर ग्राहकांना किफायतशीर दरात फळे व भाजीपाला उपलब्ध होतो, असेही ते म्हणाले.

****

No comments:

Post a Comment