Sunday, 11 September 2016

पतंजली फूड व हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार --- मुख्यमंत्री



  • 230 एकरात पतंजली फूड पार्क
  • 50 हजार पेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार
  • 5 हजार टनापेक्षा जास्त फळांची प्रक्रिया होणार
  • 5 महिन्यात उत्पादनास सुरुवात
  • विदर्भातील लाखो शेतकरी उपस्थित
  • फूड पार्कसाठी अजून 275 एकर जमीन उपलब्ध

नागपूर दि. 10 :-   मिहानमध्ये होणाऱ्या पतंजली फूड व हर्बल पार्कमुळे विदर्भात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या अन्नप्रक्रिया उद्योगाचा निश्चितपणे फायदा होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मिहान परिसरात आयोजित दिली.   
मिहानमध्ये पतंजली हर्बल पार्कच्या भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामदेव बाबा हे होते. तर विशेष अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते परिवहन, राजमार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या जीवनात या कृषी प्रक्रिया उद्योगामुळे निश्चितपणे परिवर्तन होईल. कारण उद्योजकांनी येथील शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा असे बंधन घातले आहे. जे उद्योजक फूड पार्कसाठी जमीन घेतील त्यांनी तीन वर्षात उद्योग सुरु करावा, अशी अटही त्यात घातली आहे. याशिवाय या उद्योगात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियातील मुले व पत्नींना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबतही सूचित केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पतंजली उद्योगाला जागा देतेवेळी केंद्रीय दक्षता आयोगाच्या निकषानुसार जमीन देण्यात आली आहे. या जागेसाठी तीनवेळा मिहानतर्फे टेंडर काढण्यात आले होते. तीनही वेळा पतंजलीने निविदा सादर केली. सर्व नियम व अटीच्या पूर्ततेनंतरच या उद्योगास जागा देण्यात आली आहे. पतंजलीमुळे विदर्भातील 50 हजार युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. शेतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान आणावे लागेल. सुक्ष्म सिंचनाला वाव द्यावा लागेल. शेतकऱ्यांचे एक क्लस्टर तयार करावे लागेल. शेतकरी समृद्ध झाला तरच देश व राज्य समृद्ध होईल. विदर्भ मराठवाड्यात उद्योगांना वाव मिळावा यासाठी शासनाने 4 रुपये 40 पैसे दराने  वीज देण्याचे ठरविले आहे. यासाठी वीज वितरण कंपणीला 750 कोटी रुपये शासन देणार आहे. शेतीला 12 तास वीजपुरवठा तीन महिन्यांसाठी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या तीन महिन्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात काम असते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सध्या जगात मोठी बाजारपेठ म्हणून फूड प्रक्रिया उद्योगाला वाव आहे. जगातील 700 कोटी लोकसंख्येला अन्न पुरविण्याचे असल्यामुळे या उद्योगास मरण नाही. अमरावती विभागात कापूस ते कापड हे धोरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार नांदगाव येथे शासनाने सर्व सोयीसुविधा कपडा उद्योगासाठी उपलब्ध करुन दिले आहे. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला टिकाव धरायचा असेल तर स्वदेशीने दर्जेदार माल दिला तरच हे सर्व शक्य होईल. पतंजलीने मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रात जागा घेऊन उत्पादन करण्याचे ठरविले असल्यामुळे नागपूरातून देशातच नव्हे तर जगात येथील उत्पादन जाईल हे नागपूरसाठी भूषणावह बाब आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मिहानमध्ये विशेष आर्थिकक्षेत्र सोडून फूडपार्कसाठी अजून 275 एकर जमीन उपलब्ध आहे. यासाठी ज्या कंपन्या तयार आहेत त्यांना दरवर्षी दोन हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण, 100 कोटी रुपयाचा माल विदर्भातून खरेदी करणे, तसेच एक वर्षात गुंतवणूक करावी लागेल. जमीन वाटपात पारदर्शिता ठेवण्यात आली आहे. यासाठी चार सचिवाची एक समिती नेमण्यात आली आहे. या सचिवांच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया उद्योगाला जमीन देतांना सर्व निकषांची माहिती देण्यात येते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कृषी प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकरी माल विकतांना मध्यस्थांच्या शोषणाचे बळी होतात. शेतकऱ्यांचे बाजारावर नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. हे थांबविण्यासाठी तसेच मध्यस्थांना हटविण्यासाठी थेट शेतकरी उद्योगाशी जोडल्या जातील अशी व्यवस्था निर्माण करीत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते परिवहन, राजमार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात पतंजली फूड व हर्बल पार्क कारखाना विदर्भात सुरु होणे हा सुवर्णक्षण  आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्या दिशेने केलेला हा मोठा प्रयत्न आहे. विदर्भात 75 टक्के वनक्षेत्र आहे. मोठ्या प्रमाणात वनऔषधी सुद्धा आहे. मेळघाटसारख्या भागामध्ये आयुर्वेद वनस्पती उपलब्ध आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी जागेची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. भविष्यात मिहानमध्ये जगातील मोठ्या आयटी कंपन्या येतील. त्यादिशेने प्रयत्न सुरु असून तसे करारही होत आहे. भद्रावतीत कोळश्यापासून युरीया बनविण्याचा कारखाना लवकरच उभारण्यात येईल, त्यामुळे शेतकऱ्यांना 50 टक्के किंमतीत युरीया उपलब्ध होईल, असे सांगितले.
सुरुवातीला आचार्य बाळकृष्ण यांनी प्रास्ताविक केले. व एसईझेडमध्ये जागा खरेदीचा 10 कोटी रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांना दिला. पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोपटे देऊन केले.
यावेळी खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री आशिष देशमुख, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, सुधीर पारवे, मल्लिकार्जून रेड्डी, अनिल सोले, गिरीष व्यास, समीर मेघे, रवि राणा, पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, जिल्हा भाजपा अध्यक्ष डॉ.राजीव पोद्दार, उद्योग सचिव श्यामलाल गोयल, एमआयडीचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, डॉ.जयदीप आर्य, यशपाल आर्य प्रामुख्याने उपस्थित होते.

** * * * **

No comments:

Post a Comment