राज्यात 2 लाख कोटी रुपये रस्ते विकासासाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध
* मेट्रोचे डबे निर्मितीचा कारखाना नागपूरमध्ये
* या प्रकल्पामुळे 5 हजार युवकांना रोजगार
* 25 हजार शाळा डिजिटल केल्यामुळे 17 हजार शाळांतील लर्निंग आऊटकम 100 टक्के
* 15 हजार इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांचा जि.प.शाळांत प्रवेश
नागपूर,दि.15:- केंन्द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे राज्यात आणि देशात विकासाचे मोठे काम होत आहे. राज्यातील रस्ते विकासासाठी त्यांनी 2 लाख कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात नागपूर हे भारतातील सर्वात सुंदर शहर म्हणून नावारुपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय) च्यावतीने जामठा ते फेटरी ह्या बाह्यवळण मार्गाचा पहिला टप्पा 33.5 कि.मी. चारपदरी रस्ता व फेटरी ते धारगाव या चारपदरी 28 कि.मी. महामार्गाच्या भूमीपूजन केंन्द्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते थाटात झाले. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या 20 वर्षापासून या कामाची जनता आतूरतेने वाट पहात होती. ह्या बाह्यवळण रस्त्याचा विकासामध्ये महत्वाचा वाटा असून यामुळे उद्योग, व्यापार वाढून गूंतवणूक वाढणार आहे. रोजगाराच्या संधी वाढणार असल्यामुळे सर्वांच्याच जीवनात परिवर्तन होणार आहे. देशात सुंदर शहर म्हणून नागपूर शहर ओळखले जाणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेहमीच नागपूर शहराचे हित पाहिले असल्याचे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 27 हजार कोटी रुपये त्यांनी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी दिले आहेत. नागपूरचे महत्व वाढणार आहे. जिएसटी मुळे मध्यवर्ती ठिकाण म्हणून नागपूर विकसित होणार आहे. अनेक कंपन्या नागपूर येथे आल्या असून आणखी अनेक कंपन्या इच्छुक आहेत. हा रिंगरोड रक्तवाहिणीचे काम करणार आहे.
मेट्रोरिजन – लॉजेस्टिक पार्क करण्यासाठी कार्यवाही करु असे सांगून ते म्हणाले की, एका उद्योगातून 50 हजार युवकांना रोजगार मिळेल. 778 ग्रामपंचायती डिजिटल केल्या, आता शाळा आणि रुग्णालये डिजिटल करण्यात येणार आहेत. यामुळे शिक्षणाबरोबरच आरोग्य सुविधांतही वाढ होणार आहे. सन 2018 सालापर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल करण्यात येतील. 25 हजार शाळा डिजिटल केल्याने 17 हजार सरकारी शाळाचे लर्निंग आऊटकम 100 टक्के झाला आहे. जिल्हा परिषदांच्या शिक्षणाचा दर्जा वाढल्यामुळे आता इंग्रजी शाळांतील 15 हजार विद्यार्थी जिल्हा परिषदांच्या शाळांत प्रवेश घेतला आहे. नंदूरबार सारख्या आदिवासी भागातील मुलांमध्येही शासनाच्या या उपक्रमांमुळे परिवर्तन झाले आहे.
मेट्रोसंदर्भात सामंजस्य करार आज करण्यात आला असून यामुळे आता मेट्रो रेल्वेसाठी लागणारे डबे नागपूरला तयार करण्यात येणार आहेत. डबे तयार करण्याचा कारखाना येथे होत असल्यामुळे 5 हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. रेल्वेचे डबे येथे तयार होत असल्यामुळे प्रकल्पाचा 25 टक्के खर्च वाचला आहे.
केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, बाह्यवळण रस्ता नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या मार्गावरील झाडे न तोडता त्याचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या मार्गावर एलईडी लाईट करुन प्रकाशमान करण्यात येईल. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी शहराच्या वाडीभागातील गोदामे हलवावीत. डोंगरगाव येथे ॲमिनिटी सेंटर मंजूर करण्यात आले असून तेथे सर्व रेस्टॉरंट्स, मोठे मॉल, दुकाने आदी उपयुक्त सुविधा असतील. बाह्यवळण रस्त्यावर जागा शोधून तेथे ॲमिनिटीज सेंटर सुरु करु. नागपूर शहराच्या विकासासाठी 27 हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून ती वेळेत पूर्ण करण्यात येतील. यामुळे देशातील सर्वात जास्त सिमेंट रस्ते नागपूर शहरात असतील. नागपूर शहर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नांव कमावले आहे असे सांगून ते म्हणालें की शहरात 24 तास पिण्याचे पाणी मिळेल.
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी इथेनॉलवर चालणाऱ्या 50 बसेस देण्यात येतील. नागपूर शहर स्वच्छ, सुंदर, आणि प्रदूषणमुक्त शहर बनविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहान प्रकल्पाच्या जागेचे सर्व निर्णय मंजुर केले आहेत. 28 उद्योग आल्यामुळे 9776 लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी येत्या 2 वर्षात 50 हजार स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी सुरेश भटांच्या नांवाने भव्य सभागृह बांधण्यात येणार आहे.
जागतिक पातळीवरील सर्व प्रकारचे शिक्षण सहजपणे घेता यावे यासाठी नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरु करण्यात येणार असून त्यामुळे जगातील सर्व प्रकारचे कोर्सेस नागपूर येथे येतील. येथे शिक्षण घेण्यासाठी 15 ते 20 टक्के शिक्षण शुल्कात सुट असेल. तसेच शहरातील अंबाझरी तलावाचे सुशोभिकरणासाठी जागतिक दर्जाचे संगीत तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रकल्प हाती घेणार आहोत. नागपूर जागतिक दर्जाचे ग्रीन शहर, आणि प्रदूषणमुक्त शहर असेल. एकात्मिक विकास केंद्रामुळे अमरावती येथे 12 कंपन्या आल्या आहेत त्यामुळे 4500 युवकांना रोजगार मिळाला आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 12 कोटी रुपये खर्चाचा पालखी मार्ग करणार आहोत.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.कृपाल तुमाने, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे सदस्य आर.के.पांडे यांची समयोचित भाषणे झाली. या समारंभास जिल्ह्यातील खासदार, आमदार, अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment