Thursday, 1 December 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील नऊशे फूट लांबीच्या पेन्सील रेखाटण चित्रप्रदर्शन


माधव झोड यांच्या हस्ते उद्घाटन
सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात प्रदर्शने
नागपूर दि.13 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचा समग्र आढावा घेणाऱ्या पेन्सीलद्वारे रेखाटण केलेल्या सात फूट उंच व नऊशे फूट लांब कॅनवासवर साकारलेल्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते. दीक्षाभूमी परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात नाशिकच्या रेखाटण ट्रस्टतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र जीवन दर्शन या पेन्सीलद्वारे रेखाटलेल्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 
चित्रप्रदर्शन प्रसिध्द चित्रकार अशोक नागपुरे व किशोर नागपुरे यांच्या कल्पनेतून साकारले आहे. याप्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून तर बालपण, शिक्षण, विदेशातील शिक्षण, पत्रकारिता, प्राध्यापक व वकीली व्यवसाय त्यानंतर सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील उभारलेल्या चळवळीचा समावेश आहे. काळाराम मंदीर प्रवेश, महाड येथील चवदार तळे, कोरेगाव प्रसंग, भारतीय राजघटनेचे सादरीकरण, बौध्द धर्माची दीक्षा, त्यांचे वेगवेगळया ठिकाणी असलेले वास्तव्य, स्वत: वापरत असलेल्या वस्तू, वाहन, विविध भाव मुद्रा, वंशावळ अशा विविध प्रसंगाच्या समावेश आहे.
रेखाटण ट्रस्टतर्फे नऊशे फूट लांबिच्या कॅनवासवर पेन्सीचा वापर करुन अकरा महिन्यात 27 निवडक विद्यार्थ्यांनी रेखाटण केले आहे. यासाठी कॅनवास, पेन्सील, खोडरबर व कोटींगस्प्रेचा वापर केला असून हे प्रदर्शन गिनिज वर्ड रेकॉर्ड, लिम्काबुक रेकॉर्ड व इतर सहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड निर्माण केले आहे. मुंबई येथील गोरेगाव नाशिक इंडिया सिक्युरिटी प्रेस प्रांगण आणि त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन 14 ऑक्टोबर रोजी सर्वांना निशुल्क बघता येईल. या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांनी केले.
रेखाटण ट्रस्टचे अशोक नागपुरे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात प्रदर्शनाच्या निर्मिती व आयोजनाबाबत माहिती दिली. किशोर नागपुरे यांनी आभार मानले.

00000000

No comments:

Post a Comment