Friday, 2 December 2016

पहिल्यांदाच स्वत:च्या पायावर उभी राहण्याचा आनंद *जयपूरफूटने दिला 24 वर्षानंतर आनंदीक्षण *610 अपंगांना मिळाले जयपूरफूट *पाचव्या दिवशी 989 लाभार्थ्यांची नोंदणी


नागपूर, दि. 20 :  भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रातर्फे अपंगांना जयपूरफूट व कॅलिपर आदी साहित्य बसविण्याच्या शिबिरामधील रुपाली नामदेव वडे ही 24 वर्षाची मुलगी  जयपूरफूटच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्वत:च्या पायावर उभी राहून चालत आहे. अत्यंत गरीब घरच्या मुलीला मिळालेला हा आनंद कुमारी रुपालीसह या शिबिरात येणाऱ्या प्रत्येक अपंगांच्या जीवनात नवीन उमेद देवून जाणारा ठरत आहे.
यशवंत स्टेडियम येथे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तसेच भगवान महावीर विकलांग सहाय्यता  समिती जयपूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अपंगांसाठी जयपूरफूट व  कॅलिपर बसविण्याचे शिबिराला जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून अपंगांनी  हजेरी लावली आहे. मागील सहा दिवसांपासून सुरु असलेल्या या शिबिरामध्ये 989 अपगांनी नोंदणी केली असून  त्यापैकी 610 अपगांना जयपूरफूट व कॅलिपर बसवून स्वत:च्या पायावर उभे केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी  दिली.
जिल्ह्यातील अपंगांना स्वत:च्या पायावर उभे करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी  शिबिरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यामुळे अपंगांच्या जीवनात नवी उमेद निर्माण झाली आहे. बालपणापासून अपंग असलेल्या रुपाली नामदेव वडे  या मुलीला जयपूरफूट बसवून तिला स्वत:च्या पायावर उभे करणारा जयपूरफूट म्हणजे  24 वर्षानंतर मी उभी होवू शकते हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. संताजी महाविद्यालयात 12 व्या वर्गात शिकत असलेली कुमारी रुपाली आता पदवीधर होवून नोकरी करण्याची उमेद बाळगून आहे. आई-वडीलांनाही आपली मुलगी उभी राहू शकते यावर विश्वास नव्हता. परंतु  दररोज तिला  चालविण्याचा व्यायाम देण्यासाठी  ते शिबिरात आणत आहे.
भंडारा जिल्ह्यातील देवाडीचा आनंद गणेश बंधारे या 20 वर्षांच्या युवकाचा रेल्वेखाली येवून एक पाय दोन वर्षांपूर्वी वेगळा झाला होता. या युवकालाही कृत्रिम पाय बसवून आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्याची या शिबिरामुळे उमेद निर्माण झाली आहे. दोन वर्षाच्या आसना सूर्यकांत वारजुरकर याला दोन्ही कृत्रिम पाय बसवून वाकरच्या सहाय्याने उभे करुन स्वत:च्या पायावर चालण्याचे प्रशिक्षण सुरु केले आहे. आतापर्यंत 610 अपंगांना जयपूरफूट व कॅलिपर बसविण्यात आले असले तरी त्यातील 63 अपंग पहिल्यांदाच स्वत:च्या पायावर  या शिबिराच्या माध्यमातून आपणही इतरांप्रमाणे चालू शकतो. ही नवी उमेद त्यांना निर्माण झाली आहे.

नागपूर शहरातील 449 अपंगांनी  नोंदणी  करुन  268 अपंगांना जयपूरफूट व कॅलिपर बसविण्यात आले आहे. तसेच 44  अपंगांना श्रवण यंत्र बसविण्यात आले आहे. हिंगणा, कामठी व नागपूर ग्रामीण भागातील 245 अपंगांनी  नोंदणी केली असून त्यापैकी 187 अपंगांना जयपूरफूट व कॅलिपर  तर 46 अपंगांना श्रवण यंत्र बसविण्यात आले आहे. रामटेक, पारशिवनी व मौदा तालुक्यातील 295 अपंगांनी नोंदणी केली असून 155 अपंगांना जयपूरफूट तर 74 अपगांना श्रवण यंत्र बसविण्यात आले आहे. इतर तालुक्यांसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत अपंगांना  जयपूरफूट व श्रवण यंत्र बसविण्यात येणार आहे.

अपंगच करतात अपंगांची सेवा

भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीच्या जयपूर आणि मुंबई येथून आलेल्या जयपूरफूट तयार करणाऱ्या 15 तंत्रज्ञांच्या चमूमध्ये स्वत: अपंग असलेल्या व जयपूरफूट बसविलेल्या राधेश कराड यासह  चार ते पाच युवक जयपूरफूटच्या सहाय्याने चालत असूनही आपण अपंग असलो तरी इतरांनाही चालण्याचा आनंद देण्याच्या उद्देशाने जयपूरफूट तयार करुन स्वत: आपल्या अपंग बांधवांना बसवितात. येथे येणारा प्रत्येक अपंग स्वत:च्या पायाने घरी जावा हीच भावना यामागे असल्याचे या शिबिराचे संयोजक राम राय शर्मा व नारायण व्यास यांची आहे.
जयपूरफूट बनविण्यासाठी  विनोदलाल शर्मा, विद्याधरसिंह लांबा, समर्थलाल मीना, नरेश कुमरावत, मानसिंह राठोड, भैरुलाल जांगीड आदी  30 जणांची चमू  अहोरात्र जयपूरफूट तयार करण्यासाठी व्यस्त असल्याचे या शिबिराचे समन्वयक अभिजित राऊत यांनी सांगितले.
****

No comments:

Post a Comment