Thursday, 1 December 2016

मिहान येथे उद्योग सुरु करण्यासाठी सर्वाधिक संधी रशियन शिष्टमंडळाला विश्वास -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


  • रशियन शिष्टमंडळाची मिहान प्रकल्पाला भेट
  • मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरुन शिष्टमंडळाचे आगमन
  • संरक्षण दलातील विमानांच्या देखभाल दुरुस्तीच्या केंद्रासाठी उत्सुक
  • संरक्षण मंत्रालयासोबत मुख्यमंत्री बैठक घेणार

नागपूर, दि. 14 :  संरक्षण दलामध्ये रशियन बनावटीची  विमान व हेलिकॉप्टर सर्वाधिक असून त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच हवाईदलासाठी लागणाऱ्या आवश्यक साधनांच्या निर्मितीसाठी  मिहान येथील पायाभूत सुविधा उत्कृष्ट आहेत. संरक्षण मंत्रालयातर्फे यासंदर्भात आवश्यक अनुमती मिळाल्यास मिहान येथे  सुरु करण्यासाठी रशियन शिष्टमंडळाने उत्सुकता दाखविली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
रशियाचे उद्योग व वाणिज्य मंत्री डेनिस मॅनटूरो  यांच्यासह 14 सदस्यीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरुन नागपूर भेटीवर आले आहे. मुख्यमंत्र्यासमवेत डेनिस मॅनटूरो   यांनी मिहान प्रकल्पाला भेट देवून येथील पायाभूत  सुविधा व विविध उद्योगांची पाहणी केली. त्यानंतर मिहान प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासमोर सादरीकरण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, मिहानचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष विश्वास पाटील, शिव खेमका आदी अधिकारी उपस्थित होते.
मिहान परिसरामध्ये एअर इंडिया-बोईंग (एमआरओ) तसेच एरो स्पेस उद्योगासाठी लागणाऱ्या साहित्य निर्मिती उद्योग सुरु झाले असून रशियातील उद्योजकांनी मिहानमध्ये उद्योग सुरु करावे. तसेच येथील पायाभूत सुविधा तसेच दळणवळणाच्या सुविधा संदर्भात सादरीकरण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  संरक्षण दलामध्ये  रशियन बनावटीच्या विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी, इको सिस्टिम व निर्मितीसाठी आवश्यक सुविधा असल्यामुळे रशियाचे उद्योग व वाणिज्य मंत्री डेनिस मॅनटूरो उत्सुक आहेत. परंतु त्यांना संरक्षण मंत्रालयातर्फे यासाठी आवश्यक सहकार्य हवे असून यासंदर्भात संरक्षण मंत्रालयासोबत लवकरच चर्चा करण्यात येईल. यावेळी  रशियाचे उत्पादन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. संरक्षण मंत्रालयासोबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर मिहान येथे प्रकल्प सुरु करण्याला प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रशियन शिष्टमंडळासोबत रेल्वे कंपनी तसेच जहाज बांधणी या संदर्भातही चर्चा करण्यात आली असून रशियन उद्योजकांनी भारतात व महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यास उत्सुक आहेत. या शिष्टमंडळाच्या माध्यमातून उद्योजक मिहानकडे येत आहेत. याचा निश्चितच लाभ होईल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंरद्र फडणवीस व्यक्त केला.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वागत करुन मिहान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती देतांना नागपूरच्या विमानतळ विस्तारासाठी जागतिक स्तरावर निविदा काढण्यात आल्या आहेत. एरो स्पेस व इतर महत्त्वाच्या  19 कंपन्या सुरु झाल्या असून यामध्ये प्रत्यक्ष दहा हजार युवकांना व अप्रत्यक्ष वीस हजार युवकांना रोजगार  उपलब्ध झाला आहे. एरो स्पेस इंडस्ट्रिजच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या संधीचा रशियाच्या उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. विमानतळ प्रकल्पाचे प्रमुख्य एअर मार्शल ए. के. घोष व प्रभाकर देशमुख यांनी या उद्योगासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा व भविष्यातील संधी संदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
रशियाचे उद्योग व वाणिज्य मंत्री  डेनिस मॅनटूरो   यांनी सादरीकरणानंतर मिहान परिसरात असलेल्या सुविधाबद्दल समाधान व्यक्त करतांना संरक्षण दलासाठी रशियातर्फे पुरविण्यात आलेल्या विमानांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच निर्मितीसाठी संरक्षण मंत्रालयातर्फे आवश्यक परवानगी मिळाल्यास येथे उद्योग सुरु करण्यात येईल अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात तसेच मिहानमध्ये रशियातर्फे गुंतवणूक व्हावी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.

****

No comments:

Post a Comment