Thursday, 15 December 2016

खाण पर्यटनाचा पहिला मान नागपूर जिल्ह्याला --- जयकुमार रावल


  • नागपूर दर्शन सहल बससेवेचा शुभारंभ

नागपूर, दि. 15 :  औद्योगिक क्षेत्रापेक्षाही पर्यटन क्षेत्र रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध करुन देते. म्हणून अनेक देशांची अर्थव्यवस्था तेथील पर्यटनावर आधारित आहे. आपल्या राज्यातही पर्यटनाला मोठा वाव आहे. या संधीचा उपयोग करुन पर्यटनाला आणखी विस्तारण्यासाठी खान पर्यटनाशी जोडणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग राहणार असून त्याचा पहिला मान नागपूर जिल्ह्याला मिळणार आहे,  अशी माहिती पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे ऑरेंज सिटी फेस्ट अंतर्गत ‘नागपूर दर्शन सहल बस’ सेवेचा उद्घाटन समारंभ चिटणवीस सेंटर येथे श्री.रावल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, विभागीय आयुक्त अनूप कुमार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के.एच. गोविंदराज, नागपूर मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, महाव्यवस्थापक स्वाती काळे उपस्थित होते.
 विदर्भात मोठ्या प्रमाणात खनिज खाणी आहेत. या विषयी लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे खाणी कशा असतात, तिथे कशा पद्धतीने काम चालते याची सर्व माहिती खाण पर्यटनातून पर्यटकांना समजून घेता येईल असे ते म्हणाले.
नागपूर ही केवळ राज्याची उपराजधानी नसुन टायगर कॅपीटल, ऑरेंज सिटी म्हणूनही नागपूरची ओळख आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूरला पर्यटन स्थळाची ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या नागपूर दर्शन बससेवेच्या माध्यमातून याची सुरुवात झाली असुन याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बससेवेसाठी ग्रीन बस उपलब्ध करुन द्यावी आणि या योजनेचे पालकत्व स्विकारावे अशी इच्छा श्री.रावल यांनी व्यक्त केली.
नागपूर फार वेगाने विकसित होणारे शहर आहे. अधिवेशन कालावधीत नागपुरला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. पर्यटनच्या दृष्टीने नागपुरला फोकस करण्यासाठी या कालावधीत फुड फेस्टीवल, कोराडी फेस्टीवल, नागपूर फेस्टीवल, असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचबरोबर नागपूर कॉफीटेबल बुक आणि विदर्भातील पर्यटन स्थळांची माहिती देणारे ॲप सुद्धा तयार केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अनूप कुमार यांनी महालमधील भोसलेकालीन चिटणवीस वाडा आणि दिक्षाभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लघुपट दाखवावा. तसेच ताजबाग येथे पर्यटकांना खरेदीची संधी मिळण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवावा, अशा सूचना यावेळी केल्यात.
पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के.एच. गोविंदराज म्हणाले, नागपूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सर्व पर्यटनस्थळे एकाचवेळी एकाच दिवशी पाहण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने मिळाली आहे. या बससेवेचा पर्यटकांनी भरभरुन लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
नागपूर दर्शन सहलीची माहिती देणारी घडीपुस्तिका आणि एफ एम जिंगलचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नागपूर दर्शन सहल बससेवेचा श्री.रावल यांनी फित कापून शुभारंभ केला.


****

No comments:

Post a Comment