जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा आढावा
- मुख्यालयी न राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरूध्द कार्यवाही
- प्रत्येक गाव स्वच्छ व रोग मुक्त करण्याचा संकल्प
- क्षयरोग, कुष्ठरोग, हत्तीरोग रूग्णांची जिल्हास्तरावर नोंदणी करणार
- मॉडेल आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या इमारतीसाठी निधी देणार
नागपूर दि 22 : ग्रामीण भागात साथीच्या आजारासोबतच दुर्धर आजरांवर तात्काळ नियंत्रणासाठी प्रत्येक गावात शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी अत्याधुनिक सुविधा, गाव स्वच्छतेकडे विशेष लक्ष तसेच प्रभावी व परिणामकारक आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असून चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमधून ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्या.
जिल्हा परिषदेच्या डॉ. आबासाहेब खेडकर सभागृहात जिल्ह्यातील सर्व आरोग्य सुविधांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, आमदार सुधीर पारवे, जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघोडे, अर्थ व शिक्षण सभापती मुकेश चव्हाण अतिरीक्त मुख्यकार्यपालन अधिकारी अंकुश केदार, आरोग्य उपसंचालक डॉ. सुनिल लाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेंद्र सवई, शल्यचिकीत्सक उमेश नवाडे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या व परिणामकारक आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय उपकरणे तसेच औषध पुरवठा आवश्यकतेनुसार करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. मुख्यालयात न राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरूध्द कार्यवाही करण्याच्या सूचना करतानांच आरोग्य केंद्रांना आकस्मिक भेट देऊन तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक गावात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यसाठी आवश्यक पाणी शुध्दीकरण यंत्र तात्काळ सुरू करण्यात यावे तसेच गावाची स्वच्छता व आरोग्य सुविधा याकडे विशेष लक्ष देतांना ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीमधुन ही कामे प्राधान्याने पुर्ण करावी याव्यतिरीक्त कुठलेही कामे घेतले जाणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना करतांना पालकमंत्री म्हणाले की, प्रत्येक गावात वर्षातून चोवीस वेळा औषधी फवारणी अनिवार्य करण्यात आली आहे. मोठ्या गावांना दिल्या जाणाऱ्या 50 लक्ष रूपयांचा निधींमधून 10 लक्ष रूपये पिण्याचे पाणी व स्वच्छतेसाठी राखून ठेवावे असे आदेशही त्यांनी दिले.
दुर्धर आजारांच्या रूग्णांची यादी तयार करा
क्षयरोग, हत्तीरोग, कुष्ठरोग यासोबतच दुर्धर आजार असलेल्या प्रत्येक रूग्णांची गावनिहाय यादी तयार करून त्यांच्यावर उपचारासाठी विशेष लक्ष देतांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावरून कार्यवाही करा अशा सूचना देतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अपंगांची गावनिहाय यादी तयार करून त्यांना त्यांच्या अपंगात्वर मात करण्यासाठी उपाययोजना बाबतही प्रस्ताव तयार करा यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणून एक दिवस गावांत याअंतर्गत ज्या गावांमध्ये भेट दिली आहे. अशा गावांसाठी 50 लक्ष रूपयांचा निधी देण्यात आला असून या निधी मधून पिण्याचे शुध्द पाणी, गावांतील स्वच्छता व आरोग्य सुविधा संदर्भात तात्काळ अंमलबजावणी करा असेही त्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रूग्णांना संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. व्हिडीयो कॉन्फरसींगची सुविधा निर्माण करा यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर म्हणाले की, आरोग्य विभाग चांगले काम करत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावेत अशी मागणी पालकमंत्र्याकडे केली, त्यामूळे आरोग्य सेवा प्रभावीपणे पुरविणे सोईचे होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विभागप्रमुखांनी त्यांच्या कार्यप्रणालीचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी योगेंद्र सवई यांनी संचलन केले.
यावेळी गुणवत्तापुर्वक वैद्यकीय सेवा पुरविल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळल्याबद्दल धापेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रेवाळे, मकरधोकडा येथील वैद्यकीय अधिकारी यांचा पुष्पगुच्छ देवून पालकमंत्र्यांनी गौरव केला.
*********
No comments:
Post a Comment