Tuesday, 10 January 2017

नक्षल्यांनी विकासाच्या प्रवाहात यावे -राज्यपाल सी. विद्यासागर राव






  • गोदावरी नदीवरील पुलाचे लोकार्पण
  • इंद्रावती व प्राणहितावरील पूलाचे भूमीपूजन
गडचिरोली दि. 30: तेलंगाणा ही माझी जन्मभूमी तर महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे.  आज होत असलेल्या पुलाचे लोकार्पण ही नवीन वर्षाची भेट आहे.  मागील 50 वर्षापासून पाहतो आहे नक्षली हे नुकसानच करीत आलेले आहेत.  राज्य शासनाने आदिवासी बांधवाना  स्वावलंबनाचा मार्ग दाखविला असून नक्षल्यांनी आता हिंसेचा , नुकसान करण्याचा मार्ग सोडून आता विकासाच्या प्रवाहात यावे.  असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
आज सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले.  यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  विशेष अतिथी म्हणून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते परिवहन , महामार्ग  मंत्री नितीन गडकरी होते.  तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार , तेलंगाणाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री टि. नागेश्वर राव , पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री मितेश भांगडिया,  डॅा. देवराव होळी, कृष्णा गजबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, विभागीय आयुक्त  अनुपकूमार, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, एस.ई.एस.इन्फ्राचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक सत्यनारायण स्वामी, प्रकल्प व्यवस्थापक सतपाल सिंग  यांची प्रमूख उपस्थिती होती.
राज्यपाल राव पुढे म्हणाले की, या पुलामूळे तेलंगाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ ही राज्ये महाराष्ट्राला जवळ आली आहेत.  या पुलाच्या निर्मितीमूळे  गडचिरोली जिल्हयात अनेक व्यवसायी संस्था येण्यास मदत होईल.  
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र- तेलंगाणा राज्यांनी जोडणारा हा पूल जिल्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या पुलामूळे रोजगार निर्मितीलाही मदत होणार आहे. गडचिरोली जिल्हयाच्या विकासाचा शासनाचा  संकल्प केला असून यासाठी राज्याची तिजोरी उघडी आहे असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यानंतरही अनेक गावे विजपुरवठयाशिवाय आहेत.  या गावांना 2019 पूर्वी वीज पुरवण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.  याच धर्तीवर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सादर केला. कार्यक्रमासाठी आपण जिल्हयातील या गावात वीज पोहचविण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद  येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.  जिल्हयात सिंचनाच्या माध्यमातून समृध्दी आणण्यासाठी जेवढया शेतकऱ्यांनी  विहिरीसाठी अर्ज केले आहेत.  त्या सर्व शेतकऱ्यांना विहिरी तयार करुन देण्यात येईल.  तसेच त्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन सुध्दा देण्यात येईल, असे ते म्हणाले.
मेडीगट्टा प्रकल्पामुळे या भागातील सिंचन समृध्दीत वाढ  होण्यास मदत होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुणाचीही शेती व जमीन या प्रकल्पात जाणार नसून फारच थोडी जमीन या प्रकल्पात जाणाऱ्या  शेतकऱ्यांचा रेडीरेकनर पेक्षा चारपट मोबदला देण्यात येईल.  तसेच या प्रकल्पावर उपसा सिंचन योजना  देखील कार्यान्वीत करणार असून मोठया प्रमाणात शेती सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सूरजागड खनीज प्रकल्प जिल्हयाच्या विकासासाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे  औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.  या खनीज प्रकल्पातून इतर सह उद्योगाला चालना मिळणार असल्यामुळे उद्योग व रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्हा आता विकासाच्या वाटेवर आहे.  मोठया प्रमाणात विविध विकास कामे जिल्हयात करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी गडकरी म्हणाले की, जिल्हयाच्या विकासात पुलांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.  पूलाची कामे वेळेत पूर्ण होतील.  इथल्या वन, जल आणि खनीज संपत्तीमुळे गडचिरोली जिल्हा धनवान आहे.  मात्र येथील लोक गरीबीचे जीवन जगत आहे. त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सिंचन, रस्ते, उद्योग यासह अनेक योजना राबविण्यात येईल.
देशाचा विकास झाला पाहिजे हे प्रत्येकाला वाटते असे सांगून गडकरी म्हणाले, सिंचनासाठी पाणी, कृषी मालाला योग्य भाव आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.  सिंचन, उद्योग आणि  बेरोजगारांना रोजगार  उपलब्ध करुन देवून जिल्हयाचे चित्र बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशात आज 22 लाख चालकांची आवश्यकता असल्याचे सांगून श्री. गडकरी म्हणाले, जिल्हयात वाहन चालक प्रशिक्षण संस्था व प्रदुषण नियंत्रण केंद्र सुरु करण्यासाठी  1 कोटी रुपयांची मदत करण्यात येईल तसेच जिल्हयातील 10 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन  देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना केंद्रीय गृहराज्य मंत्री  हंसराज अहिर म्हणाले, जिल्हयातील खनीज संपत्तीचा पुरेपूर वापर करण्यात येईल. पुलामुळे विकासाला गती मिळणार आहे. देशातील आदिवासी, गरीब हा विकासात मागे राहण्यामागे त्यांच्या विकासात येणारा अडथळा ही मुख्य समस्या आहे.  नक्षल कारवायांना आळा घालण्यासाठी अशा पुलाची आवश्यकता होती.  नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, मानव विकास निर्देशांकात गडचिरोली  34 व्या स्थानावर आहे.  12 हजार कोटीपेक्षा जास्त निधी जिल्हयांच्या रस्ते विकासासाठी  गडकरी यांनी मंजूर केला आहे. गोंडवाना विद्यापीठ देशातील सर्वात चांगले विद्यापीठ बनविण्यात येईल यासाठी  राज्यपालांनी  देखील पुढाकार घेतला आहे. जिल्हयाच्या विकासासाठी  निधी कमी पडू देणार नाही. मोहाफूल उद्योगातून जिल्हयात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.
गडचिरोली येथे केंद्रीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्हयात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्यास नक्षलवादापासून अनेकजण दूर जातील. वनउद्योग विकास महामंडळ गडचिरोली जिल्हयात सुरु करून अनेकांना रोजगार यातून उपलब्ध करून देण्यात येईल.  
पालकमंत्री आत्राम म्हणाले, सिरोंचा भागाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून या पुलामुळे मोठी सुविधा निर्माण झाली आहे. येणा-या काळात हा पुल विकासाचा मार्ग ठरणार आहे. सुरजागड प्रकल्पामुळे दहा ते वीस हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. मेडीगटटा प्रकल्पामुळे या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार असून या प्रकल्पावर उपसा सिंचन योजना सुरु झाल्यानंतर येथील शेतक-यांना बारा महिने सिंचनाची व्यवस्था होणार आहे. कोटगुल प्रकल्पालादेखील राज्यपालांनी मान्यता दिल्याचे  आत्राम यांनी सांगितले. यावेळी मंत्री नागेश्वर राव, खासदार अशोक नेते यांनीही मार्गदर्शन केले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाच्या 683.72 किमी लांबीच्या कामासाठी 6659.79 कोटी रुपये मंजूर केले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गांतर्गत पुलांची कामे 0.945 किमी करीता 180 कोटी, 155 किमी नियतकालीन नुतनी करणाच्या कामाकरीता 166.15 कोटी रुपये,  16 किमी केंद्रशासित रस्ते निधी अंतर्गत कामांसाठी 19.60 कोटी रुपये, 117.1 किमी डावी कडवी विचारसरणी अंतर्गत कामांकरीता 159.60 कोटी रुपये, 2.33 किमी डावी कडवी विचारसरणी अंतर्गत पुलाचे कामाकरीता 534.40 कोटी रुपये, आरआरपी 2 याकरीता 3942 कोटी रुपये आणि 202.20 किमी च्या ॲन्युटी वर्कस करीता 435.12 कोटी रुपये असे एकूण 1177.275 किमी साठी 12046.66 कोटी रुपये मंजूर केलेले आहे.
गोदावरी नदीवरील पुलाचे लोकार्पण केल्यानंतर मान्यवरांनी गडचिरोली -सिरोंचा- हैद्रराबाद या 536 किमी अंतर सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या निम आराम बससेवेचा शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून केला. तर मंचावर नागरिकांच्या आरोग्य पत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन तसेच इंद्रावती व प्राणहिता नदीवरील मोठया पुलाचे भुमिपूजन देखील यावेळी करण्यात आले. गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला पुल 1620 मीटर लांबीचा असून यावर 292 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तत्पुर्वी गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी योगदान देणाऱ्या अभियंत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात अधीक्षक अभियंता, प्रदिप खवले, कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, अतुल मेश्राम, सहाय्यक अभियंता श्रीकांत दवे, उपविभागीय अभियंता विजय भोगाडे, कनिष्ठ  अभियंता विजय सेलोकर, शाखा अभियंता ए.एस. सय्यद यांचा समावेश होता. यावेळी दोन्ही राज्यातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक सा.बां विभागाचे सी. पी. जोशी यांनी केले.
                                                ०००००००

No comments:

Post a Comment