- निधीतून दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात 40 कोटी,
- विद्युत तारांच्या भूमिगतीकरणाच्या 13.50 कोटी रुपये किमतीच्या कामांचा प्रारंभ
- बँडमिंटन कोर्टचे भूमीपूजन
नागपूर, दि.30 : सांडपाणी, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, प्रदूषणविरहीत ग्रीन व क्लीन बस, सिमेंटरस्त्यांचे जाळे, त्यांच्या माध्यमातून खड्डेमुक्त शहर, मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीच्या समस्येवर मात, कौशल्य विद्यापीठाचे लवकरच उद्घाटन तसेच सीसीटीव्ही आणि वायफायच्या माध्यमातून देशातील सर्वात आधुनिक शहर म्हणून नागपूरचा विकास करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निधीतून दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात 40 कोटी रुपये किमतीच्या कामाचे व जमिनीवरील विद्युत तारांच्या भूमिगतीकरणाच्या 13.50 कोटी रुपये किमतीच्या कामांचा प्रारंभ आणि संभाजी पार्क बँडमिंटन कोर्टचे भूमीपूजन अशा विविध विकास कामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर आमदार प्रा. अनिल सोले, महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, मुन्ना यादव, राजीव हडप, नगरसेविका श्रीमती उषा निशीतकर, श्रीमती पल्लवी श्यामकुळे, श्रीमती जयश्री वाडीभस्मे, श्रीमती नीलिमा बावणे, श्रीमती सुमित्रा जाधव, श्रीमती सफलता तांबटकर, नगरसेवक श्री. गिरीश देशमुख, नगरसेवक श्री. गोपाल बोहरे, महानगरपालिका आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सिंधी कॉलनीतील श्री. सरोदोमल चावला, श्री. कवडोमल साधवानी, श्री. चंद्रप्रकाश गजरानी, श्रीमती इंदिराबाई बालानी आणि श्रीमती मीराबाई हेमनानी या पाच नागरिकांना नझूल लीज पट्टयांचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या विकासनिधीच्या माध्यमातून विजेच्या तारांचे भूमिगतीकरणाचा प्रारंभ आज करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने हे काम पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. शहरात सांडपाण्याचे व्यवस्थापन, ओपन जीम पार्कसारखी विकास कामे हाती घेण्यात आली असून, त्याचा प्रारंभ छत्रपतीनगरातून करण्यात आल्याचे ते म्हणाले.
भांडेवाडी प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यापासून 18 कोटींचा महसूल मिळत असल्याचे सांगून त्यापाठोपाठ आता टाकाऊ कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूर मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून शहरातील रस्ते वाहतुकीवर भविष्यात पडणारा ताण कमी होणार असून सिमेंटरस्त्यांच्या जाळेनिर्मितीमुळे खड्डेमुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरत असल्याचे ते म्हणाले. लवकरच नागपूर स्मार्ट सिटीच्या कामांना प्रारंभ होणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की शहराला सीसीटीव्ही, तसेच वाय फाययुक्त बनवणार आहे. तसेच नागरिकांना ग्रीन व क्लीन बसेसच्या माध्यमातून स्मार्ट वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. तसेच पर्यावरणपूरक शहरनिर्मितीवर भर देण्यात येत असून, त्यासाठी दरवर्षी 300 कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पाच हजार नागरिकांना पट्टेवाटप
सिंधी कॉलनीतील नागरिकांना 15 वर्षांपूर्वी नझूल पट्टेवाटप करण्यात येणार होते. मात्र, ते अद्यापपर्यंत झाले नाही. मात्र त्यांना व नागपुरातील झोपडपट्टीतील पाच हजार नागरिकांना नव्या वर्षाच्या प्रारंभी हे पट्टेवाटप करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. तसेच कायदेशीर अडचणींवर मात करुन प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना घरे देऊन स्वत: घरात राहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासन विदर्भात 50 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. रामदेव बाबा यांच्याकडूनही रोजगारनिर्मिती सुरु आहे. विमानतळाचे आधुनिकीकरण, कार्गो हब, कार्गो टर्मिनल, लॉजिस्टीक पार्कवर भर देण्यात येत असल्याचे त्यातून 30 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त केल्यानंतर शहराबाहेरील विकासासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात येत असून, शहराला सर्वोत्तम करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात महापौर प्रविण दटके यांनी मुख्यमंत्र्यांनी एनआयटी बरखास्त करुन शहरवासियांना नववर्षाची भेट दिल्याचे सांगितले तसेच गेल्या अडीच वर्षात 1500 कोटी रुपये दिले असल्याचे सांगून विकास कामे आणि त्यासाठी खर्चाच्या निधीची पुर्तता करत दिलेला शब्द पाळल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी यांनी आभार मानले. यावेळी मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
*******
No comments:
Post a Comment