Friday, 31 March 2017

पाणी टंचाई निवारणासाठी 65 गावांत 100 नवीन विधंन विहिरी --- सचिन कुर्वे

नागपूर, दि. 29 : उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी 65 गावांमध्ये 100 नवीन विंधन विहिरींना मान्यता देण्यात आली आहे. टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना तात्काळ पूर्ण करण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
            पाणी टंचाई निर्वारणाअंतर्गत राबवावयाच्या उपाययोजनांमध्ये नवीन विंधन विहिरी घेण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून नवीन विंधन विहिरी घेण्याबाबतचा प्रस्ताव सादर झाला होता. जिल्ह्यातील भिवापूर, नागपूर (ग्रामीण), कुही, कामठी, मौदा, रामटेक आदी तालुक्यातील 65 गावांमध्ये 100 नवीन विंधन विहिरींसाठी 94 लाख 5 हजार 100 रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
            नवीन विंधन विहिरी घेतांना संबंधित खंड विकास अधिकारी यांनी भूजल सर्वेक्षण विभागातर्फे सर्वेक्षण करुन तांत्रिक मान्यता तसेच शिफारसीसह संबंधित यंत्रणेकडून प्रस्ताव सादर करताना उपलब्ध साधनाद्वारे होणारा पाणी पुरवठा पुरेसा नसल्यामुळे संबंधित गावांना पाणी पुरवठा करणे आवश्यक असल्यामुळे नवीन विंधन विहिरींना मान्यता देण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेल्या विंधन विहिरींमध्ये नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील 11 गावे, कुही तालुक्यातील 7 गावे, कामठी तालुक्यातील 13 गावे, मौदा तालुक्यातील 27 गावे तर रामटेक तालुक्यातील 7 गावांमध्ये 100 विहिरी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
0000

No comments:

Post a Comment