मुंबई, दि. 29 : सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या कुंडलिका नदी संवर्धन व सुशोभिकरण आराखड्यातील कामांना तातडीने मंजुरी देऊन निधी वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या कुंडलिका नदी संवर्धन व सुशोभीकरण आराखड्यासंदर्भात आज विधानभवनात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार सुनिल तटकरे, आमदार अनिल तटकरे, मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, रोहा नगरपरिषदेचे अध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष शिल्पा धोत्रे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आराखड्याच्या सद्य:स्थितीची माहिती घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी कुंडलिका नदी घाटावरील सुशोभीकरणाअंतर्गत एकूण 37 कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. याअंतर्गत जलकुंभ बांधणे, शौचालयाचे बांधकाम, नदी किनाऱ्यावर रिटेनिंग वॉल बांधणे आदी कामांना राज्यस्तरीय प्रकल्प समन्वय समितीने मंजुरी द्यावी आणि निधीचे वितरणही करावे, तसेच रिटेनिंग वॉलसाठी तत्वतः मंजुरी देऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवावा, असे निर्देश दिले.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रोह्यामध्ये अहिल्यादेवी पुष्करणी तलाव व बगिचा विकसित करण्यास मान्यता देण्यात यावी, रोह्यातील राज्य शासनाची मळीची एक एकर जागा रोहा नगर परिषदेस नाममात्र भाड्याने देण्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठवावा, तसेच पाणी पुरवठ्याच्या अपूर्ण कामांनाही तातडीने मंजुरी देऊन काम सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
०००
No comments:
Post a Comment