Wednesday, 19 April 2017

ग्राहकांमध्ये हक्काविषयी जागृती आवश्यक - डॉ. एम.एस. कामत


  • ग्राहक मार्गदर्शन शिबीर संपन्न
  • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,
  • भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था, मुंबईचे आयोजन
नागपूर, दि. 18 : बदलत्या जीवनशैलीमुळे खाद्यपदार्थांपासून दैनंदिन वापराच्या अनेक उत्पादनांसाठी आपण किंमत मोजतो. यावेळी ग्राहकाने आपल्या हक्काविषयी जागृत आणि दक्ष रहावे, असे प्रतिपादन भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेचे सचिव डॉ. एम.एस. कामत यांनी केले.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था, मुंबई  यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित केलेल्या ग्राहक मार्गदर्शन शिबिरात डॉ. कामत बोलत होते.
शिबिरास जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, अन्न, धान्य वितरण अधिकारी एल. जे. वार्डेकर, प्रशांत काळे, भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेचे सदस्य विक्रांत जिंदल, ॲड. राजीव काकडे, प्रफुल्ल पवार, श्रीमती अर्चना कामत, टी.आर. पांडे, संतोष अढाव, ग्राहक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्राहकांना मार्गदर्शन करताना डॉ. कामत म्हणाले की, आपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो. वस्तू खरेदी करणारा आणि सेवेचा लाभ घेणारा व्यक्ती ग्राहक असतो. ग्राहक हा राजा आहे. परंतु अनेकवेळा ग्राहकांची वस्तू खरेदी करताना फसवणूक केली जाते. अशावेळी ग्राहकांनी आपल्या हक्काविषयी जागृत असणे गरजेचे आहे. ग्राहकांमध्ये एकजूटपणा आणि जागरूकता निर्माण होणार नाही तोपर्यंत ग्राहकांची फसवणूक थांबणार नाही, असे ते म्हणाले.
ग्राहक जाहिरातीला बळी पडतो. पण अशा फसव्या जाहिरातीपासून ग्राहकाने दूर राहावे. खाद्यपदार्थ, औषधी, मोबाईल अथवा सेवेचा लाभ घेत असताना फसवणूक झाल्यास भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेकडे तक्रार नोंदवून दाद मागावी. आपल्या अडचणी आणि प्रश्नांबाबत माहितीसाठी संस्थेचा टोल फ्री क्रमांक  १८०० २२२२६२ वर संपर्क साधवा, असे आवाहन डॉ. कामत यांनी केले.
भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेचे सदस्य प्रफुल्ल पवार यांनी विमा, म्युच्युअल फंड आदी सुरक्षित गुंतवणूक पर्यायाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, ऑनलाईन खरेदी करण्याची फॅशन दिवसेंदिवस वाढत आहे. पण ऑनलाईन खरेदी करताना काही गोष्टी आपण विचारात घेऊन मगच खरेदी केल्यास ऑनलाईन ग्राहक बनताच स्मार्ट कस्टमर होवू शकतो. सर्वप्रथम, ऑनलाईन खरेदी करताना ज्या वेबसाइट्सच्या मार्फत आपण खरेदी करणार असू ती वेबसाईट, वस्तूंची उपलब्धता आणि दर्जा या बाबतीत कशी आहे ते तपासून पाहणे आवश्यक आहे. तसेच प्रधानमंत्री जन-धन योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रत्येक नागरिकांचे खाते बॅकेत असावे आणि बॅकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक करावा. डिजिटललायझेशन व्यवहार ग्राहकांच्या फायद्याचा असून  ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूकीला आळा बसेल, असे प्रफुल्ल पवार म्हणाले.
ग्राहक मार्गदर्शन शिबिरात ग्राहक जागृतीबाबत माहितीपट दाखविण्यात आला. शिबिरामध्ये ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक ॲड. राजीव काकडे यांनी  तर संचालन श्रीमती स्नेहल बेंदेवार यांनी केले.

****

No comments:

Post a Comment