Wednesday, 19 April 2017

राज्य मागासवर्ग आयोगाने स्विकारली निवेदने

नागपूर, दि.18 :  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे विविध संघटना, तसेच जाती समन्वयक यांनी आपली निवेदने आयोगाचे तज्ज्ञ सदस्य सर्जेराव भाऊराव निमसे, डॉ. प्रमोद येवले, तसेच सुधीर ठाकरे, यांनी स्विकारले. यावेळी पाचशे लोकांनी परिपूर्ण प्रस्ताव, करारनामा, ज्या जिल्हयामध्ये जात आहे त्या सर्व जिल्हयातील लोकांच्या त्यात समावेश करुन सर्व कागदपत्रे 15 मे पर्यंत राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी समाज कल्याण विभागाचे उपायुक्त माधव झोड उपस्थित होते. ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे आयोजित करण्यात आली होती. मस्जिद उस्मानिया चुनावाला नागपूर या संघटनेकडून चुनेवाले, चुनगर, चुनावाला या जातीला इतर मागासवर्ग समूहामध्ये समाविष्ट करण्याबाबत निवेदन दिले. मुख्य प्रवर्तक महाराष्ट्र राज्य किराड (किरात) समाज नागपूर यांनी किराड या जातीचा समावेश भटक्या जमातीच्या यादीत करण्याचे निवदने दिले. भोयर पवार जातीबाबत भोयर पवार विद्यार्थी मंडळ कारंजा यांनी भोयर पवार जातीची नोंद राज्याच्या यादीमध्ये क्र.189 व 226 वर आहे. भोयर, पवार, भोईर, पोवार या सर्व तत्सम आहे. त्यामुळे यांच्या नोंदी एकत्रितरित्या एकाच नंबरवर असण्याबाबतचे निवेदन दिले.
पांचाळ जातीबाबत उपासराव पैकुजी पोचमवार गोंदिया या संघटनेने पांचाळ ही जात पांचाळ लोहार प्रमाणे विजा, भज मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. खासदार डॉ. विकास महात्मे, संस्थापक अध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समिती नागपूर यांचेकडून ठेलारी या जमातीचे धनगर या जातीमध्ये समाविष्ट करणेबाबत निवेदन दिले. शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकामध्ये राईन, बागवान शब्दापुढे कुंजडा शब्दाचा समावेश करण्याबाबत व इतर मागासवर्ग यादीत समाविष्ट करणेबाबत हाजी मंगरुल हक नागपूर या संघटनने निवेदन दिले. त्याचप्रमाणे नाभिक समाज, अन्सारी, मोमीन, अहिर, भामटी, माना (आदिवासी विकास समिती) या जाती समुहातील संघटनेने देखील आपली निवेदने आयोगापुढे सादर केली.
बैठकीत नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य तथा उपायुक्त आर.डी. आत्राम, वर्धा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य तथा उपायुक्त सुरेंद्र पवार, गडचिरोली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य तथा उपायुक्त राजेश पांडे, सहायक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ तथा संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती किशोर भोयर उपस्थित होते.

00000000

No comments:

Post a Comment