प्र. प. क्रं. 582 दिनांक :26 जुलै,2017
कारगिल विजयाची शौर्यगाथा सदैव प्रेरणा देणारी
· कारगिल सैनिक पाल्यांच्या वसतीगृहात
विजय दिवसाचे आयोजन
नागपूर दि. 26:- कारगिल युध्दामध्ये भारताने पाकीस्तानवर विजय मिळविला. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये झालेले हे युध्द जगातील सर्वात कठीण युध्द होते. देशाच्या रक्षणासाठी भारतीय सैनिकांनी दिलेले बलिदान मोलाचे असून कारगिल युध्दामध्ये मिळविलेल्या विजयाच्या शौर्यगाथा युवकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले.
सिव्हील लाईन येथील माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी असलेल्या कारगिल सैनिक वसतीगृहामध्ये आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युदधाची प्रतिकृती असलेल्या कारगिल स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन या युदधात शहीद झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रमेश वांढरे उपस्थित होते.
तरुणांमध्ये देशाविषयी स्वाभिमान व अभिमान असून तो अधिक दृढ होण्याची आवश्यकता आहे. देशातील तरुण पिढीला नशेच्या आहारी नेण्याचे कार्य परकीय शक्तींकडून होत आहे. याप्रकारे देशात अस्थिरता निर्माण करण्याची छुप्या पध्दतीची ही युध्दनिती आहे. याबाबत आजच्या तरुण पिढीने जागरुक राहणे महत्वाचे आहे. तसेच समाजामध्ये राहत असतांना राष्ट्रप्रेमाच्या व शुर सैनिकांच्या शौर्यकथा इतरांना सांगितल्यास देशप्रेम वाढण्यास मदत होईल व प्रत्येक तरुणामध्ये राष्ट्राभिमान कायम राहील. असेही अनिल गडेकर यांनी यावेळी सांगितले.
कारगिल युध्दामध्ये अनेक जवान शहीद झाले. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. या युध्दामध्ये 524 जवान व अधिकारी शहीद झाले होते. तसेच 1063 सैनिकांना कायमचे अपंगत्व आले होते. या सर्व जवानांच्या शौर्यामुळेच विजयश्री प्राप्त झाली. भावी पिढीला राष्ट्रप्रेम व सैनिकांच्या शुर कर्तृत्वाची जाणीव असावी याकरीता कारगिल विजय दिवस साजरा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले.
यावेळी कारगिल युध्दामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच कारगिल विजया निमित्त विशेष तयार करण्यात आलेल्या कारगिल स्मारकासमोर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. दिप प्रज्वलन करुन विजयी दिवसाची सुरुवात करण्यात आली. सैनिकांच्या पाल्यांनी स्मारकास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. श्रध्दा शराफ यांनी केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप जाधव, जिल्हा सैनिक कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक अशोक घटे तसेच वसतीगृहातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment