अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल रचित ‘महाभारत की पूर्वसंध्या’चे सादरीकरण
मुंबई, दि. 28 : ‘महाभारत की पूर्वसंध्या’ या महाकाव्यातून महाभारतात कमी लेखलेल्या पात्रांना व्यवहारिकदृष्ट्या न्याय मिळवून देण्याचा कल्पक प्रयत्न विनीत अग्रवाल यांनी केला असल्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक काल (रविवार) येथे सांगितले.
अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल रचित ‘महाभारत की पूर्वसंध्या’ या महाकाव्याचे सादरीकरण एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट) मधील नाट्यगृहात पार पडले, यावेळी ते बोलत होते. श्री. मल्लिक म्हणाले, विनीत अग्रवाल हे कल्पक कवी व अधिकारी असून हे महाकाव्य महाभारतातील पात्रांवर नव्याने व्यवहारिकदृष्ट्या प्रकाश टाकून भाष्य करणारे आहे. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक विवेक फणसाळकर, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, प्रकाश झा प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अभिनेता आशिष कौल, विवेक ओबेरॉय, स्वप्नील जोशी, अभिनेत्री पूनम ढिल्लन आदी मान्यवर व रसिक उपस्थित होते.
महाभारत की पूर्वसंध्या या महाकाव्याचे सादरीकरण विनीत अग्रवाल यांनी स्वत: केले. हे सादरीकरण एवढे अप्रतिम होते की सर्वांनी उभे राहून दाद दिली. दरम्यान अभिनेत्री ढिल्लन यांनी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी या काव्यरचनेसाठी आपण 19 पुस्तकांचे वाचन करून त्याचा संदर्भ घेतला असल्याचे श्री. अग्रवाल यांनी सांगितले. महाभारताचा आपल्या जीवनाशी कशा प्रकारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहे, त्यातून आपण काय घ्यावे आणि काय नको यावरही त्यांनी भाष्य केले. तर श्री. अग्रवाल रचित हे महाकाव्य साहित्याचा अप्रतिम नमुना असून ते अंतर्मुख करणारे असल्याचे गौरवोद्गार श्री. अख्तर यांनी काढले. ते पुढे म्हणाले, महाभारत हे महासागराप्रमाणे आहे. आपण जेवढ्या वेळा त्यात डुबकी मारणार तेवढ्या वेळा नवीन मोती आपली वाट पाहत असतात. याचे जेवढे चिंतन, वाचन केले तेवढ्या नवनव्या बाबी समोर येतात. श्री. अग्रवाल सारख्या लेखकांनी साहित्य विश्वाची मुळे घट्ट करण्याचे काम केले असल्याचेही ते म्हणाले. तर महाभारतातील आतापर्यंत दुष्ट समजल्या जाणाऱ्या पात्रांच्या वेगळ्या पैलुंची ओळख या काव्यातून झाली असल्याचे अभिनेता विवेक ओबेरॉय व स्वप्नील जोशी यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment