नागपूर दि. 29:- लोकसहभागातूनच विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करतानाच या पाणीसाठ्यांचा उपयोग करुन कृषीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विकास करता येणार आहे. कृषीक्षेत्रावर राज्याचा आर्थिक विकास शक्य आहे. त्यासाठी कृषीक्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. कृषी पदव्युत्तर वसतीगृहाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थानचे संचालक डॉ. एम.एस.लदानिया, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोगिता संस्थानचे संचालक डॉ. एस. के. सिंग, केंद्रीय कापूस अनुसंधानचे संचालक व्ही. एन. वाघमारे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी. एम. मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, प्रज्ञा गोडघाटे व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्याचा विकास हा कृषी विकासावर अवलंबून असून, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवनवे प्रयोग करणे आवश्यक आहेत. प्रायोगिक तत्त्वावर शेती करण्याला प्राधान्य देण्याची वेळ आता आली आहे. शेतकऱ्यांना नवनवी यंत्रसामुग्री राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून पुरवत आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेत स्वावलंबी होणे आवश्यक असल्याचे सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी सांगितले.
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर माजी मालगुजारी तलाव आहेत. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून या जलाशयांमधील गाळ काढण्यात येत आहे.मामा तलावांमध्ये असलेल्या पाण्यातून शेतीचे उत्पादन तर वाढविता येते. यावर्षी जरी पूर्व विदर्भातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी नंतरच्या पावसाने दिलासा दिला आहे. शिवाय निलक्रांतीमुळे मासेमारी, भात पीक आणि शिंगाड्यासारखी कृषीपूरक उत्पादनेही घेता येतात. या उत्पादनांच्या माध्यमातून शेतकरी समृध्द होऊ शकतो. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी योजनांबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगोला येथील शेतकऱ्यांनी स्वत:ला कसे समृध्द केले याबाबत माहिती दिली.त्यांच्याप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांनी समृध्द होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पाण्याचे योग्य नियोजन करुन प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागाची जबाबदारी महत्तवाची असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जावून राबविण्यासाठी कृषी विभागाचे याकडे त्यांनी लक्ष वेधले. असे झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील सधन शेतकऱ्यांसारखे विदर्भातीलही शेतकरी सधन व समृध्द होतील, असा विश्वास सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
हे कृषी चर्चासत्र व प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. प्रदर्शनात उच्च कृषी तंत्रज्ञानाचे लाईव्ह मॉडेल आहे.कृषी व संलग्न विभागातील योजनांची माहिती विविध स्टॉल्सच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.तसेच चर्चासत्रामध्ये रेशीम व्यवसाय, मत्स्यव्यवसाय,वनशेती, मधूमक्षकिा पालन, कुक्कुटपालन, इत्यादी कृषीपूरक जोडधंदे यावर तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञानामध्ये पॉलिहाऊस,शेडनेट हाऊसमध्ये भाजीपाला, फुलपीके उत्पादन, इस्त्रायल पध्दतीने संत्रा लागवड, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर विविध स्टॉल्सच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. शेतकरी गटाव्दारे उत्पादित कृषी मालाची विक्री, आणि कृषी विभाग व आत्मा यंत्रणेचे विविध उपक्रम यावर तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
No comments:
Post a Comment