Wednesday, 27 September 2017

हिरज येथे राष्ट्रीय दर्जाचे रेशीम पार्क उभारणार - वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख

मुंबई, दि. 27 : सोलापूर जिल्ह्यातील हिरज (उत्तर सोलापूर) येथे राष्ट्रीय दर्जाचे रेशीम पार्क उभारण्यासाठी जमीन उपलब्ध झाली आहे. याबाबतचा आराखडा तयार करून हिरज येथे राष्ट्रीय दर्जाचे रेशीम पार्क उभारणार असल्याचे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे सांगितले. याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. देशमुख बोलत होते.
            श्री. देशमुख म्हणाले की या राष्ट्रीय दर्जाच्या रेशीम पार्कमध्ये प्रशिक्षण केंद्र, संशोधन केंद्रखरेदी केंद्र, प्रक्रिया केंद्र अशी चार केंद्र प्रस्तावित आहेत. तसेच रेशीम धागा तयार करण्यासाठी अटोमॅटीक  रिलिंग मशीनचा प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सोलापूरच्या रेशीम तज्ज्ञांचा एक अभ्यास गट तयार करून तो रेशीम संदर्भातील माहिती अभ्यासण्यासाठी म्हैसूरच्या प्रसिद्ध वस्त्रोद्योग केंद्रात पाठवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून रेशीम पार्क च्या निधीसाठी पाठपुरावा करावा. तसेच या रेशीम पार्क मध्ये विक्री व्यवस्थाप्रक्रिया आणि निर्यात यावर अधिक भर द्यावा त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळेल. रेशीम पार्क उभारण्यासंदर्भातला आराखडा कालबद्ध वेळेत सादर करावा, अशा सूचना मंत्रीमहोदयांनी यावेळी दिल्या.
बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, नागपूर रेशीम संचालनालयाचे संचालक श्री. मीना, सोलापूर जिल्हा रेशीम अधिकारी श्री. जाधव, सहायक संचालक श्री. हाके आदी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment