Wednesday, 27 September 2017

बी.टी. कापसाच्या बी.जी-२ बियाणांना वाणिज्यिक मान्यता देण्याबाबत पुनर्विचार व्हावा

सदाभाऊ खोत यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी

मुंबई, दि. २७  :  बी.टी. कापसाचे वाण शेंदरी बोंड अळीला बळी पडत असून शेंदरी बोंड अळीच्या विरोधातील प्रतिकार क्षमता कमी झाल्याचे निरीक्षण नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने केलेल्या सर्वेक्षणामध्ये नोंदविले आहे. त्यामुळे बी. टी. कापसाच्या बी. जी.-२ बियाण्यांना वाणिज्यिक मान्यता देण्याबाबत पुनर्विचार करावा, असे निवेदन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांना दिले आहे.
महाराष्ट्रातील सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्र कापूस पिकाच्या लागवडीखाली आहे. त्यापैकी अंदाजे ९८ टक्के लागवड ही बी. टी. कापसाची केली जाते. राज्यात खरीप हंगामामध्ये सुमारे १ कोटी ६५ लाख बी. टी. कापसाच्या बियाणांची पाकिटे वापरली जातात. कापूस लागवडीसाठी बहुतांश शेतकरी बी.टी. कापसाची लागवड करतात. केंद्र शासनाच्या जैव तंत्रज्ञान विभागाने बी.जी.-२ तंत्रज्ञानावर आधारित बियाणे उत्पादनाची परवानगी बियाणे उत्पादकांना दिली आहे.  परंतु सध्यस्थितीत बी.टी. कापसाचे वाण शेंदरी बोंड अळीला बळी पडत असून, शेंदरी बोंड अळीच्या विरोधातील प्रतिकार क्षमता कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
शेंदरी बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक औषध फवारणी करावी लागत आहे. कापूस उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढलेला असून उत्पादकता कमी झालेली आहे. त्यामुळे शासनाने बी.टी. कापसाच्या बी.जी.-२ बियाणांना वाणिज्यिक मान्यता देण्याबाबत पुनर्विचार करावा. तसेच बीटी कापूस बियाणांची प्रतिकार क्षमता कमी झाल्याने, त्यांना फक्त संकरीत बियाणे म्हणून मान्यता दिल्यास कापूस बियाण्यांचे भाव कमी होवून शेतकऱ्यांना फायदा होवू शकतो. तरी केंद्र शासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत केंद्रीय कृषीमंत्री तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्री यांच्याकडे विनंती करावीअसेही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री. खोत यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment