- विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत असलेल्या जमिनींच्या मोबदल्यात वाढ
- हिंगणा तालुक्यातील 278 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
- पूर्वी अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांनाही वाढीव लाभ
नागपूर, दि.29 : विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत अधिग्रहीत केलेल्या अथवा थेट खरेदी केलेल्या जमिनीच्या बाबतीत बाजार मूल्य ठरवताना घटक दोन अधिसूचित करण्यात आल्यामुळे समृध्दी महामार्गासाठी हिंगणा तालुक्यातील अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला पाचपट मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत जमिनीचे भूसंपादनासंदर्भात महसूल व वन विभागाच्या अधिसूचने नुसार हिंगणा तालुक्यातील महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी संपादीत केलेल्या जमिनीसंदर्भात मोबदला देताना गुणांक (घटक) एक वरुन दोन करण्यात आला असल्यामुळे अधिग्रहीत केलेल्या तथा थेट खरेदी केलेल्या जमिनीचा मोबदला आता पाचपट मिळणार आहे. यापूर्वी हा मोबदला अडीचपट मंजूर करण्यात आला होता. या नवीन निर्णयाचा लाभ नागपूरसह नाशिक व ठाणे जिल्हयातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.
विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत कृषी क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जमिनीच्या मोबदल्यात वाढ झाल्यामुळे हिंगणा तालुक्यातील 278 शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. तालुक्यातील 207 हेक्टर जमीन समृध्दी महामार्गासाठी संपादीत करण्यात येणार आहे. थेट जमीन खरेदीचा पाचपट भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला असून समृध्दी महामार्गासाठी जमिन संपादन करण्यास सहकार्य मिळत आहे.
समृध्दी महामार्गासाठी हिंगणा तालुक्यातील यापूर्वी थेट खरेदी केलेल्या जमिनीचा मोबदला नवीन नियमाप्रमाणे वाढीव मिळणार आहे. वाढीव रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्राधान्याने जमा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.
000000000
No comments:
Post a Comment