मुंबई, दि. 28 : निम्न वर्धा सिंचन प्रकल्प येथे प्रस्तावीत 7 मेगा वॅट व बेंबळा सिंचन प्रकल्पापैकी 8 मेगा वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
मंत्रालयात आज झालेल्या बैठकीला महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार डॉ.अनिल बोंडे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, विदर्भ सिंचन विकास मंडळाचे संचालक अ. ब. सुर्वे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक सतीश चौरे, महानिर्मितीचे संचालक विकास जयदेव उपस्थित होते.
प्रकल्पांतर्गत आर्वी उपसा सिंचन योजना (4.2 मे.वॅ.) व खर्डा बॅरेज उपसा सिंचन योजना (2.8 मे.वॅ.) यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पासाठीचा विकास आराखडा व प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. बावनकुळे यांनी दिले. बेंबळा येथील सिंचन प्रकल्पावर 8 मे.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. बेंबळा व निम्न वर्धा येथील सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती येण्यासाठी अभियंत्यांची पदे भरती करण्यात यावी. असेही ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील सर्व उपसा सिंचन प्रकल्प सौर ऊर्जेवर चालविण्याचा शासनाचा मानस असून पुढील 10 वर्षात 40लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित सिंचन सुविधा पुरविण्याचा शासनाचा निर्धार आहे. याकरिता लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
००००
No comments:
Post a Comment