मुंबई, दि. 28 : राज्यातील सहकारी दूध संघांच्या सद्याच्या दूध दरासंदर्भात येणाऱ्या समस्यांबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या निर्देशानुसार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच काढण्यात आला.
राज्यातील प्रमुख सहकारी दूध उत्पादक संघांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्री महोदयांच्या अध्यतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यातील सहकारी दूध संघांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सचिव (पदुम) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये दुग्धव्यवसाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपसचिव (दुग्ध) यांची सदस्य म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. समितीने आपला अहवाल 10 दिवसात सादर करावा, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.
००००
No comments:
Post a Comment