Thursday, 1 February 2018

नागपूरचा आयटीआय स्मार्ट करणार - चंद्रशेखर बावनकुळे

* आधुनिकीकरणाचा प्रस्ताव 15 दिवसांत सादर करा
* जिल्ह्यातील सर्व आयटीआयमध्ये सुविधा देणार

नागपूर, दि. 1 :   मिहानसह सर्व  उद्योगांना  आवश्यक व उद्योजकांच्या गरजेनुसार तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकासासोबतच नागपूर येथील आयटीआयचा देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट संस्था म्हणून विकास करण्यात येणार आहे. या आयटीआयच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.  त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत  होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक चंद्रकांत निनाळे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व प्राचार्य उपस्थित होते.
नागपूर परिसरातील उद्योजकांना आवश्यक असलेले तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उपलब्ध सुविधांमध्ये वाढ करण्यासोबतच अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नागपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे असलेल्या 19 एकर जागेवर अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम करुन तसेच विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा व प्रशिक्षण उपलब्ध व्हावे या दृष्टीने या संस्थेचा  विकास करण्यात येईल. तसेच देशातील सर्वोकृष्ट व स्मार्ट आयटीआय करण्यात येणार आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने 25 नवीन अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्याचा प्रस्ताव असून यामध्ये नागपूर येथे 13 नवीन तुकड्या राहणार आहेत. या परिसराचा विकास करताना ग्रीन बिल्डिंग, अत्यानुधिक यंत्र सामुग्री व उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मार्ट नागपूर आयटीआयचे सादरीकरण दाखविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांना मागणीनुसार आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे आधुनिकीकरणाचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, अशी सूचना केली. या संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना  चांगल्या उद्योगांमध्ये संधी उपलब्ध होईल यासाठी प्लेसमेंट सेंटर सुरु करावे व यामध्ये राज्यातील सर्व उद्योजकांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ मार्गदर्शक नियुक्त करावा, अशी सूचना केली. मागील वर्षी सरासरी केवळ 22 टक्के विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध मॉडेल आयटीआय म्हणून विकास करण्यात येत असल्याचे सह संचालक चंद्रकांत निनाळे यांनी सांगितले.
****

No comments:

Post a Comment