* प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा
* अंमलबजावणीतील अडचणींबाबत मुंबईला बैठक
नागपूर, दि. 1 : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत जिल्ह्यातील 45 हजार 938 शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी विमा उतरविला असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसानी संदर्भातील अनुदान देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात. तसेच वैयक्तीक पीक विमा योजनेतील अंमलबजावणी संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी कृषी मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, लीड बॅंक व्यवस्थापक अयुब खान, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत जिल्ह्यातील खरीप हंगामात 45 हजार 938 शेतकऱ्यांनी पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी 6 कोटी 59 लक्ष रुपये विम्याचे कवच दिले होते. हा विमा भारतीय कृषी विमा योजना व नॅशनल इन्शुरन्स कंपनी या दोन कंपन्यांमार्फत उतरविण्यात आला होता. यामध्ये कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांचा समावेश होता. पिकांचे वैयक्तीक नुकसान तसेच सामूहिक नुकसान या दोन गटात विम्याचे संरक्षण दिले जाते.
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत विम्याचे संरक्षण घेतांना पूराचे पाणी, गारपीट तसेच पीक कापून ठेवल्यानंतर पावसामुळे झालेले नुकसान आदि बाबत नुकसान भरपाई देण्यात येते. वैयक्तीक विमा धारकांना नुकसानी संदर्भात मोबदला देतांना येणाऱ्या अडचणीबाबत सुधारणा करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये वीज पडणे, नैसर्गिक आग लागणे इत्यादी बाबींचा पीक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट चा समावेश आहे. परंतू ही बाब वैयक्तीक सर्वेक्षणात समावेश करण्यात यावी. तसेच कीड व रोग याबाबत क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्यामुळे याचाही समावेश पीक विमा योजनेत करण्यात यावा. भात पिकाकरिता रोपवाटिका व त्याच्या नुकसानी बाबत तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रोवणी न झाल्यामुळे योजनेमध्ये सहभाग घेता येत नाही. स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामध्ये वीज कोसळणे, अतिवृष्टी याचा समावेश आदि तृटी बाबत निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी व माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी पिकांच्या वैयक्तीक नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळावे याबाबत विविध सूचना केल्यात. प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना व त्याच्या अंमलबजावणीबाबत बैठकीत माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment