Thursday, 1 February 2018

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माहिती द्या - चंद्रशेखर बावनकुळे



* प्रत्येक बँकेत शेतकऱ्यांच्या याद्या लावा
* बँक खात्यातील अडचणींची माहिती कळवा

नागपूर, दि. 1 :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत प्रत्यक्ष कर्जमाफी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफी संदर्भातील माहिती एसएमएसद्वारे सर्व बँकांनी कळविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा करतांना येणाऱ्या अडचणी संदर्भातील माहिती कर्जखात्यासह बँकेत जाहीर करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कर्जमाफी योजनेसंदर्भात विविध बँकांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, लीड बँक व्यवस्थापक अयुब खान तसेच जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके आदी उपस्थित होते.
कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा झाल्याबाबतची माहिती एसएमएसद्वारे सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी प्राधान्याने द्यावी तसेच कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यास अडचणी आहेत. अशा सर्व खातेदारांपर्यत पोहोचून त्यांना या संदर्भात माहिती द्यावी तसेच बँकेत सुद्धा यादी जाहीर करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी नागपूर जिल्ह्यात उत्कृष्ट काम झाले आहेत. ग्रीन लिस्टप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी प्राधान्याने कर्जमाफीची रक्कम कर्जखात्यात जमा केली आहे. परंतू या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी झाल्यासंदर्भात माहिती देणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था, संबंधित बँकेचे प्रतिनिधी व तहसीलदारांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कर्जमाफीची रक्कम कर्जखात्यात जमा करतांना बँक खाते क्रमांक तसेच खातेदाराचे नाव आदी तांत्रिक अडचणी असतील अशा शेतकरी खातेदारांना ज्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होऊ शकली नाही. अशा शेतकरी खातेदारांची यादी तयार करावी. तसेच तालुका स्तरावरुन या खातेदारांना कळविण्याबाबत स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचना दिल्यात.
***

No comments:

Post a Comment