गडचिरोलीच्या विकासासाठी
तरूणांच्या हाती रोजगार आवश्यक
गोंडवाना विद्यापीठाचा 5 वा
पदवीदान समारंभ उत्साहात
गडचिरोली, दि.31 - निसर्ग
संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी तरूणांच्या
हाती रोजगार असणे आवश्यक आहे. त्याकरीता गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायभिमुख
शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री
नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या
विद्यापीठाच्या पाचव्या दिक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मंचावर राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
नामदेव कल्याणकर, प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, प्रभारी कुलसचिव डॉ. ईश्वर
माहुर्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा हा निसर्ग संपन्न
असलेला श्रीमंत जिल्हा आहे. मात्र बेरोजगारी, गरिबी यासह विकासात्मक मागासलेपण या
प्रमुख समस्या या ठिकाणी आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, या जिल्ह्यातील समस्या
सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही
जिल्ह्याचा विकास हा शिक्षण, उद्योग व शेतीच्या विकासावर अवलंबून असतो. शिक्षण हा
विकासाचा महत्वाचा गाभा असून त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठाची आहे.
तरूणांच्या हाती केवळ पदव्या आल्याने कुठल्याही जिल्ह्याचा विकास होत नाही, तर
त्या पदव्या प्राप्त केल्यानंतर मिळालेल्या शिक्षणाचा समाज व जिल्ह्याच्या
विकासासाठी कसा उपयोग होतो, यावर अवलंबून आहे. उच्च शिक्षणाची पदवी प्राप्त करूनही
अनेक तरूण बेरोजगार आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना
व्यवसायभिख शिक्षण देण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रोजगार
वाढविण्यासाठी शेतीच्या विकासाबरोबरच उद्योग येणेही आवश्यक आहे. उद्योग
आणण्याकरीता सरकार प्रयत्नशील असून त्याकरीता गडचिरोलीतील नागरिकांनी डाव्या
विचारसरणीला थारा न देता विकासात्मक विचारांना साथ देण्याची आवश्यकता आहे. हा
विकास करतांना जिल्ह्यातील जल, जंगल व जमीन यांचा समतोल साधण्याची गरज आहे.
वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले,
विद्यार्थ्यांसाठी हा क्षण आयुष्याला दिशा देणारा आहे. विद्यार्थ्यांनी या
शिक्षणाचा उपयोग आपल्या आयुष्यात करावा. गडचिरोलीच्या विकासासाठी शासन कटीबध्द
असून विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी यावेळी
सांगितले. गडचिरोलीला विशेष निधी दिला जात असून भविष्यात देशातील उत्तम जिल्हा
करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तरूणपिढी घडविण्याची जबाबदारी विद्यापीठावर
असल्यामुळे विद्यापीठाने पारंपारीक शिक्षण पध्दती सोडून नाविण्यपुर्णता व
संशोधनात्मक शिक्षणपध्दतीकडे वळण्याची वेळ आता आली आहे, असेही ते म्हणाले.
गडचिरोलीच्या विकासासाठी विद्यापीठाने
पुढाकार घेऊन संशोधन करणा-या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध कल्पना कागदावर
प्रत्यक्ष उतरवून राज्य शासनापर्यंत पोहचवाव्या. त्यावर शासन निश्चितच सकारात्मक
विचार करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी
दिले. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील तरूण विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवित
आहेत. येत्या काळात या जिल्ह्यांची विकासात्मक ओळख देशात निर्माण होईल, अशी आशा
त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कुलगुरू कल्याणकर म्हणाले, हे
विद्यापीठ संशोधक विद्यार्थ्यांची ऑन लाईन परीक्षा घेणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे.
केवळ सहा वर्षाच्या अल्पावधीत विद्यापीठात विविध शाखांमधून ३७ विद्यार्थ्यांनी
आचार्य पदवी प्राप्त केली आहे. विद्यापीठाने शैक्षणिक दर्जाबाबत जागरूकता बाळगून
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या विद्यापीठात ५
पदव्युत्तर शैक्षणिक विभागांमध्ये एकूण १८ सहायक प्राध्यपकांची नियुक्ती झाली असून
१० सहयोगी प्राध्यापक ५ प्राध्यापक यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. एकूण २२
पदव्युत्तर शिक्षण विभागांसाठीचे प्रस्ताव शासनाला सादर केले गेले आहेत, अशी
माहिती त्यांनी यावेळी दिली.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत सुरू
व्हावे, यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यपुर्ण प्रयत्न केले.
त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी या विद्यापीठाची स्थापना झाली.
त्यानंतर हा आजचा पाचवा दिक्षांत समारंभ आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या विकासाकडे
सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने लक्ष दिले आहे. त्यांच्याच प्रयत्नातून
विद्यापीठास स्वतःची अशी जागा आरमोरी रोडवर आता मिळणार आहे. याचा पाठपुरावा
मुनगंटीवार यांनी सातत्याने केला. इतकेच नव्हे तर या जागेच्या खरेदीसाठी प्रशासनास
८९ कोटी रूपयांचा निधी देखील त्यांनी प्रदान केला आहे.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आचार्य पदवी, विविध विषयात
प्रथम स्थान मिळविणा-या विद्यार्थ्यांना सुर्वण पदकासह विविध पदक व गुणवत्ता
प्रमाणपत्र बहाल करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात राज्यमंत्री राजे अम्बरीशराव
आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता
भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे यांच्यासह
विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. संचालन प्रा. नरेंद्र आरेकार व प्रा. शिल्पा आठवले यांनी
केले.
******
No comments:
Post a Comment