Wednesday, 28 March 2018

औद्योगिक वापराच्या बर्फात निळसर रंग टाकण्याचे निर्देश - गिरीश बापट


मुंबई, दि.28:बर्फाचा वापर खाद्यपदार्थ तसेच उद्योगासाठीही केला जातो. औद्योगिक कारणास्तव वापरण्यात येणारा बर्फ हा पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्यापासून तयार करून तो अनेकदा खाद्यपदार्थातही वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हा बर्फ ओळखता येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी अखाद्य बर्फात निळसर रंग टाकण्याबाबतचे निर्देश दिले आहेत,अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.
श्री. बापट म्हणाले, खाण्यासाठी सुरक्षित व दर्जेदार अन्न पुरविण्याची जबाबदारी अन्न सुरक्षा व मानके कायदा राबविणा-या यंत्रणेची आहे. खाण्यास अयोग्य असलेला बर्फ ओळखता येत नसल्याने मनुष्याच्या आरोग्याची हानी होऊ शकते. ही बाब विचारात घेऊन खाण्यास योग्य आणि अयोग्य बर्फ ओळखण्यासाठी, खाण्यास योग्य असलेल्या बर्फात कोणताही रंग टाकू नये तसेच अखाद्य बर्फात निळसर रंग टाकण्याबाबतचे आवश्यक आदेश निर्गमीत करण्यात आले. याची अंमलबजावणी करण्याबाबत अन्न सुरक्षा आयुक्त यांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती श्री बापट यांनी या निवेदनाद्वारे दिली.
००००

No comments:

Post a Comment