राज्यस्तरीय महिला उद्योजिका चर्चासत्र
मुंबई, दि. 27 : राज्यात बचत गट चळवळ यशस्वी ठरली आहे. आता
या बचतगटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे,
असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. उद्योग विभाग आणि वर्ल्ड ट्रेड
सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एम. एस. एम. ई दिनानिमित्ताने
आयोजित राज्यस्तरीय महिला उद्योजक चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी राज्यभरातील
शेकडो यशस्वी उद्योजक महिलांनी चर्चासत्रात सहभाग नोंदवला.
चर्चासत्राचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या
हस्ते झाले. यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश
गवई, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, उद्योजिका कल्पना सरोज, पूनम सोनी, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालक
रुपा नाईक, उद्योजक विजय कलंत्रीआदी उपस्थित होते. यावेळी
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंकिता श्रॉफ, अरुंधती
जोशी, मुमताज पठाण, पुजा अहिरे या
यशस्वी उद्योजिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. देसाई म्हणाले, राज्य शासन महिला उद्योजकांना प्रोत्साहन
देण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिला उद्योजकांची संख्या केवळ नऊ टक्के असून ती 20
टक्के वाढवण्याचे राज्य शासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. महिलांनी ठरवल्यास हे प्रमाण
लवकरच पन्नास टक्के जावू शकते. महिलांसाठीचे
उद्योग धोरण केवळ कागदावर राहू नये, तर त्याची प्रत्यक्ष
अमलंबजावणी होण्याची गरज श्री. देसाई यांनी व्यक्त केली. महिलांना उद्योग
उभारण्यासाठी लागणारी जमीन, अनुदान, कर्ज
सवलत देण्यास राज्य शासन तयार आहे. केवळ महिलांना या क्षेत्रात पुढे येण्याची गरज
आहे. महिलांना उत्पादित केलेल्या मालाचे परदेशात मार्केटिंग करण्यासाठीदेखील राज्य
शासन अनुदान उपबल्ध करून देत आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी परदेशात आपल्या
वस्तुंचे प्रदर्शन भरवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शंभर टक्के महिलांची
मालकी असे तरच शासनाच्या सर्व सवलतींचा महिलांना फायदा होईल, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. असे असले तरी पुरूषांच्या मालकीचा
एखादा उद्योग बंद पडला असेल तर महिलांना एकत्र येऊन तो चालवण्याची तयारी
दर्शवल्यास त्यांना मदत केली जाईल. महिला बचत गटांनी एकत्र येऊन मोठा उद्योग उभा
करू शकतात, त्यासाठी त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. महिला
उद्योजिकांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रत्येक जिल्ह्यात
चर्चासत्राचे आयोजन केले जाणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
उद्योग राज्यमंत्री श्री पोटे पाटील यांनी जास्तीत जास्त
महिलांनी उद्योग क्षेत्रात यावे व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.
आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते असेही ते म्हणाले. आता पर्यंत
सुमारे 28 हजार महिला उद्योजिकांना प्रशिक्षण दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य सचिव श्री. गवई यांनी महिलांच्या उद्योग वाढीसाठी पुरुषांच्या
मानसिकतेत बदल येण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. महिला उद्योजिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन
बदलण्याची गरजही त्यांनी बोलून दाखविली.
विकास आयुक्त डॉ. कांबळे यांनी धोरण आखण्यामागची
पार्श्वभूमी आणि धोरणातील फायद्यांची माहिती दिली. परदेश दौरे करण्यासाठी, पेटंट घेण्यासाठी आणि भाग भांडवल उभारण्यासाठी शासन मदत करण्यास तयार
आहे. त्याचप्रमाणे ‘मैत्री’ इथे
महिलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
कमानीट्यूबच्या व्यवस्थापकीय संचालक कल्पना सरोज म्हणाल्या, खेडेगावातून मुंबईत आल्यानंतर एकाही
रस्त्याची ओळख नव्हती. राहण्यासाठी घर
नव्हते. कपडे पुरेसे नव्हते. असे असताना कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर केवळ
पन्नास हजाराच्या भागभांडवलावर दोन हजारकोटी रुपयांचा उद्योग उभारला. याच मुंबई
शहरातील दोन रस्त्यांना आपले नाव लागल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे हे यश साधता आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्वेलरी क्षेत्रातील पुनम सोनी यांनी आपला अनुभव
सांगितला. ज्वेलरी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सरकारने सवलत देण्याची गरज आहे.
सकारात्मक बदल आणि यशस्वी मार्केटिंगच्या जोरावर कुठल्याही गरूडझेप घेता येते, असे त्या म्हणाल्या. ज्वेलरी क्षेत्रात
अनेक अडचणी असताना त्यावर मात करून आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकवला.
तरीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याकडे पुरेशा सुविधा मिळत नाही,
त्या मिळणे गरजेचे आहे
दिवसभर चाललेल्या या चर्चा सत्रात उद्योग क्षेत्रात यशस्वी
झालेल्या महिलांनी मार्गदर्शन केले. यात अभियांत्रिकी उद्योग- महिला
उद्योजिकांसाठी संधी, ग्रामीण उद्योग,
वित्तीय सहाय्य, आतंरराष्ट्रीय बाजारपेठ व
उद्योगांचे व्यवस्थापन या सारख्या विविध विषयांवर चर्चा सत्र पार पडले. या
कार्यक्रमाला सुमारे 600 महिलांनी सहभाग नोंदविला.
००००