Wednesday, 4 July 2018

विधान सभेत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांसह दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली


            नागपूरदि. 4 : विधान सभेत कृषीमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्यासह दिवंगत सदस्य भाई वैद्य, बापुराव पानघाटे, दगडू बडेपाटील यांना भावपूर्वक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सभागृह नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत शोक प्रस्ताव सादर केला.
            विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या शोक प्रस्तावात दिवंगत फुंडकर यांचे कार्य सविस्तर विशद करुन भावपूर्ण आदरांजली वाहिली. तसेच दिवंगत पांडुरंग फुंडकर यांचा विधिमंडळाचा उत्तम अनुभव हा मार्गदर्शक असून त्यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणाचे पुस्तक लवकरच विधिमंडळामार्फत प्रकाशित केले जाईल, असे सांगितले. तसेच दिवंगत सदस्य भाई वैद्य, बापुराव पानघाटे, दगडू बडे-पाटील यांच्या कार्याबद्दलही गौरवोद्गार काढून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक प्रस्तावात दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांनी शेती व मातीशी इमान असलेले नेते असून, त्यांच्या निधनाने आधारवड कोसळला अशी भावना व्यक्त केली. ते एक समर्पित व्यक्तीमत्व असून आपल्या जबाबदारीचे उत्तम अनुपालन करत संघटनेला सर्वौच्च स्थान देणारे नेते होते. उन्नत व समृध्द शेतीसाठी त्यांनी विविध निर्णय घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाऊसाहेब फुंडकर यांना आदरांजली वाहत माजी राज्यमंत्री दिवंगत भाई वैद्य यांच्या कार्याचा आढावा घेतला. दिवंगत बापुराव पानघाटे व दगडू बडे-पाटील यांच्या कार्याबद्दलही माहिती देऊन श्रध्दांजली अर्पण केली.
            विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील दिवंगत फुंडकर यांना श्रध्दांजली वाहताना संयमी, संवेदनशील, निगर्वी वर्तणूक असलेला, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदैवाने अग्रभागी सहभाग असलेला नेता, एखाद्या विषयाची महती लक्षात येताच त्या विषयाच्या निर्णयापर्यंत ते जात असल्याचे सांगितले. तसेच इतर दिवंगत सदस्यांनाही त्यांच्या कार्याचा उल्लेख करुन श्रध्दांजली अर्पण केली.
            यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री अजित पवार, गणपतराव देशमुख, संजीव रेड्डी, अनिल गोटे, एकनाथ खडसे, श्रीमती दीपिका चव्हाण, जिवा पांडू गावित, शशिकांत खेडेकर यांनीही शोकभावना व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली.
000

No comments:

Post a Comment