Wednesday, 1 August 2018

नरेश अग्रवाल व हेमंत कानडे ठरले विजेते


लोकसेवा हक्क अधिनियमासाठीच्या
बोधचिन्ह-घोषवाक्य स्पर्धेचा निकाल जाहीर
मुंबई, दि. 1 : जनतेला पारदर्शक आणि गतिमान सार्वजनिक सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या (Right to Services) बोधचिन्ह रेखाटन आणि घोषवाक्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह रेखाटन आणि घोषवाक्य निर्मितीसाठी राज्य सेवा हक्क आयोग आणि राज्य शासनामार्फत स्पर्धा घेण्यात आली होती. बोधचिन्ह रेखाटन स्पर्धेत १८२ तर घोषवाक्य स्पर्धेसाठी २४४ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या सहभागी प्रवेशिकांमधून मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षेतखालील समितीने विजेत्या रचनांची निवड केली. त्यामध्ये नरेश अग्रवाल यांनी रेखाटलेले बोधचिन्ह आणि हेमंत कानडे यांनी निर्माण केलेले घोषवाक्य सर्वोत्कृष्ट ठरले आहे. त्यांचा वापर राज्य सेवा हक्क आयोगाचे अधिकृत बोधचिन्ह व घोषवाक्य म्हणून करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लवकरच या रचनांचे अनावरण होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ या कायद्याअंतर्गत आतापर्यंतवर ३९ विभागांच्या ४६२ सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपले सरकार संकेतस्थळ, मोबाईल अॅप्लिकेशन, ई-महासेवा केंद्र, सेतू केंद्र आणि आपले सरकार केंद्र याद्वारे या सेवांचा लाभ देण्यात येतो. या कायद्याचा प्रचार व प्रसाराचा भाग म्हणून आयोजित या स्पर्धेमुळे लोकसेवा हक्क अधिनियमास नवीन ओळख प्राप्त होणार आहे.
000

No comments:

Post a Comment