Saturday, 1 September 2018

‘लोकराज्य’ मासिक स्पर्धा परीक्षांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त - डॉ. प्रमोद लाखे

                नागपूर, दि. 01 : महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकातील माहिती विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसह सर्वांगिण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ‘लोकराज्य’ हे शासनांच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करते, त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्तही प्रत्येकाने ‘लोकराज्य’ अंकाचे नियमित वाचन करावे, असे आवाहन प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी आज केले. 
            जिल्हा माहिती कार्यालयाच्या


वतीने जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राच्या सभाकक्षात आयोजित केलेल्या ‘लोकराज्य वाचक मेळाव्या’चा शुभारंभ प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
            यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक प्रवीण खंडारे,  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ-दांदळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आजपासून राज्यभर ‘लोकराज्य वाचक अभियाना’स सुरुवात झाली आहे. हे अभियान 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.  
            विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संचालक डॉ. प्रमोद लाखे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांच्या माहितीचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्य मासिक प्रकाशित केले जाते. लोकराज्य मासिकात राज्य शासनाची अधिकृत माहिती व आकडेवारी उपलब्ध असते. ही माहिती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे लोकराज्य केवळ शासनाने मुखपत्र नाही तर मौल्यवान असा संदर्भग्रंथ आहे. म्हणूनच माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातही आजही लोकराज्याची विश्वार्साहता कायम आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी ही लोकराज्य अंकाच्या वाचनाशिवाय अपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी संदर्भासाठी यातील दिलेली अधिकृत माहिती कोणताही परिक्षक नाकारु शकत नाही, असेही ते म्हणाले. 
            स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बाजारात विपूल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. परंतू यातील नेमके काय वाचावे, हे ज्या विद्यार्थ्यांला कळाले, त्याचा अभ्यास अल्पावधीत आणि परिपूर्ण होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती करुन त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर यश निश्चितच मिळेल. युवकांनी आपल्या पायावर उभे होऊन केवळ स्वत:ची प्रगती साधू नये तर आपण सामाजिक ऋण फेडू शकलो पाहिजे एवढे स्वत:ला सक्षम करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक राधाकृष्ण मुळी म्हणाले, लोकराज्य मासिकाची फार जूनी परंपरा आहे. लोकराज्याचे आजतायागतचे अंक बघता ‘महाराष्ट्राचा धावता इतिहास’ आपल्या नजरेसमोर उभा राहतो. लोकराज्य अंकात लिखाण करणारे लेखक त्या-त्या विषयातील तज्ज्ञ असतात. लोकराज्याचे बरेच अंक हे त्याकाळातील महत्त्वाच्या घडामोडीवर आधारित असतात. त्यामुळे एखाद्या विषयाची सखोल व अधिकृत माहिती मिळविण्यासाठी लोकराज्याशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या अभ्यासकाच्या दृष्टीने जी मुलभूत माहिती लागते, ती लोकराज्याच्या माध्यमातून सहजगत्या आणि अल्प किमतीत उपलब्ध होते. नागरिकांचा सर्वांगिण विकास हेच शासनाचे ध्येय आहे. ग्रामीण भागात देखील शासनाच्या विविध योजनांची माहितीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी लोकराज्य मासिक फायदेशीर ठरत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम सुरु करण्यात आला असून या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली.  
            प्रास्ताविक करताना जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी लोकराज्य मासिकाचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचन करावे तसेच इतरांनाही याबाबत माहिती द्यावी. ते म्हणाले, लोकराज्यासारख्या मासिकातून करियर घडविण्यास इच्छूक विद्यार्थ्यांना रोजगाराची नवी दालने, शासकीय योजना यांची अधिकृत माहिती उपलब्ध होते. लोकराज्य मासिकाचे विविध विशेषांक हे वाचनीय व माहितीपूर्ण असतात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे व याबाबत इतरांनाही माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाचे ‘महाराष्ट्र वार्षिकी- 2018’ जिल्हा माहिती कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.
            यावेळी सहाय्यक संचालक प्रवीण खंडारे यांनी देखील मनोगत व्यक्त करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आजपासून सुरु करण्यात आलेल्या लोकराज्य वाचक मेळाव्याच्या स्तृत्य उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ-दांदळे यांनी मानले.
*****

No comments:

Post a Comment