नागपूर 1 : प्रत्येक घरामध्ये निर्माण होणारे वाद समोपचाराने मिटविले तर न्यायालयात जाण्याची वेळ येणार नाही. मध्यस्थी ही एक प्रकिया आहे. न्यायालयात येणारे वाद विवाद परस्पर संमतीने सोडविण्याची आवश्यकता आहे. यासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा न्यायाधीश एस.एस. दास यांनी व्यक्त केले.
जिल्हा न्यायालय येथे मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी न्यायाधीश ए. के. शर्मा, जिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक धनराज काळे, बार असोसिएशनचे वकील प्रकाश जयस्वाल तसेच पक्षकार आदी उपस्थित होते.
न्यायालयात तक्रार घेवून येणाऱ्या पक्षकारांचे मध्यस्थीकडून योग्य समायोजन होणे गरजेचे आहे असे न्यायाधीश दास यावेळी म्हणाले.
न्यायालयात आज असंख्य केसेस प्रलंबित आहेत. मध्यस्थीच्या माध्यमातून अशी प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावे त्यामुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टीचा अपव्यय होणार नाही, असे मत बार असोसिएशनचे वकील प्रकाश जयस्वाल यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी न्यायाधीश ए. के. शर्मा यांनी ‘मध्यस्थीचे मूलतत्वे’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर धनराज काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार ॲड. सुरेखा बोरकुटे यांनी मानले.
*****
No comments:
Post a Comment