स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मेळाव्याने राज्यस्तरीय 'लोकराज्य वाचक अभियाना'ला सुरुवात
मुंबई, दि. 1 : 'स्वयंप्रेरणा, मानसिक बळ आणि सातत्यपूर्ण प्रयत्न' ही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याची त्रिसूत्री असल्याचे पालघरचे सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले.
'लोकराज्य वाचक अभिमान' अंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथे आयोजित 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन'कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर, संपादक सुरेश वांदिले, वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर, मनीषा पिंगळे, सहायक संचालक मंगेश वरकड, युनिक अकॅडमीचे मंगेश खराटे, भरत खताळ, श्रीकांत साळुंके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी युवकांना उद्देशून बोलताना श्री. कुंभार म्हणाले, 'स्पर्धा परीक्षेचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून हा बदल त्वरित स्वीकारून त्याप्रमाणे तयारी करणाऱ्या उमेदवाराला लवकर यश मिळते. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सकारात्मकता अधिक महत्वाची असते. चांगली मानसिक स्थिती यश मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यासाठी कुटूंबाचेही पाठबळ आवश्यक असते. यूपीएससीची तयारी करताना सतत माहितीचे अद्ययावतीकरण करणे आवश्यक असते. शिवाय उमेदवाराने पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करताना अभ्यासाबरोबरच वेळेचे नियोजन करायला हवे.' दरम्यान श्री. कुंभार यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. मानकर म्हणाले, लोकराज्य हे मासिक गेली सात दशके शासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे. राज्याच्या संपूर्ण वाटचालीचा इतिहास सांगणारे लोकराज्य घरोघरी असावे.' तर अधिकाधिक युवक व नागरिकांनी लोकराज्यचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन श्री. वांदिले यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. दरम्यान 'लोकराज्य'च्या निर्मिती प्रक्रियेची ओळखही श्री. वांदिले यांनी युवकांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जोगळेकर यांनी तर आभार मंगेश खराडे यांनी मानले.
'लोकराज्य वाचक अभियान' अंतर्गत विविध कार्यक्रम
राज्यभर 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान ‘लोकराज्य वाचक अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाने करण्यात आला. या अभियानांतर्गत लोकराज्य वाचकांचे मेळावे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा आदी कार्यक्रम राज्यभर घेतले जात आहेत.
००००००
No comments:
Post a Comment