Thursday, 6 September 2018

विविध विकास कामे पूर्ण करण्याला प्राधान्य राहील - डॉ. संजीव कुमार



* जलयुक्तमुळे 1 लाख 87 हजार हेक्टर संरक्षित सिंचन
* कृषी, आरोग्य, महसूल विकासाला प्राधान्य
* झुडपी जंगलाचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक

            नागपूर, दि. 06 : विकासाच्या विविध क्षेत्रात नागपूर विभागात चांगले काम झाले असून यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध विकास कामे पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. आरोग्य, कृषी तसेच महसूल विभागासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागासोबत बैठक घेवून विकासाची कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.
            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात माध्यम संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी  डॉ. संजीव कुमार बोलत होते. या कार्यक्रमाचे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, रोहयोचे उपायुक्त के. एन. के. राव, नियोजन उपायुक्त कृष्णा फिरके  आदी उपस्थित होते.
            जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रथम वर्षापासून 1683 गावांची निवड झाली होती. त्या अंतर्गत 1499 गावे जल परिपूर्ण झाली आहेत. या अभियानामुळे 2 लाख 12 हजार 449 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामधून 2 लाख 86 हजार हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन निर्माण झाले असल्याचे सांगनाना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, यावर्षी या अभियानांतर्गत विभागत 1139 गावांची निवड झाली असून सर्व गावांचे गाव आराखडे सुद्धा तयार झाले आहेत.   
            विभागात नैसर्गिक परिस्थितीचा विचार करुन पुरेसा पडणाऱ्या  पावसामुळे भूजलाचे पुनर्भरण व जमिनीवर साठवणूक वाढवून संरक्षित सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी  सीसीटी, दगडी बांध, गॅबियन बंधारे. सिमेंट बंधारे आदी कामे जलयुक्त अंतर्गत घेण्यात आले आहेत.
            विभागात असलेल्या माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवन कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला असून यामुळे सुमारे 300 वर्षांपूर्वीच्या काळात बांधलेले 6 हजार 740 माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्ती व पुनरुज्जीवनाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. मागील दोन वर्षांत 1 हजार 863 कामे सुरु झाली असून त्यापैकी 1 हजार 616 कामे पूर्ण झाली आहेत. अकरा हजार विहिरी बांधकामांतर्गत विभागात  11 हजार 498 कामे सुरु झाले आहेत. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून संपूर्ण कामाचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. महाऑनलाईन पोर्टलवर 8 हजार 168 विहिरींची नोंद घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. 
            विभागात बोंड अळी निर्मुलनासाठी विशेष अभियान राबविण्यात येत असून या अभियानामध्ये शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. विभागात असलेल्या झुडपी जंगलाच्या प्रश्नासंदर्भात वन विभागासोबत बैठक घेवून हा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी सुरु असून मजुरांची उपस्थिती तसेच निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा व  विहिरींची कामांमध्ये राज्यात विभागाची उत्कृष्ट कामगिरी असल्याची यावेळी सांगितले.
            विभागात सरासरी पावसाच्या 93 टक्के पाऊस झाला आहे.  पीक पेरणी, कर्ज वाटप आदी बाबतही विभागीय स्तरावर नियमित आढावा घेण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
            प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले.
***

No comments:

Post a Comment