* क्रीडांगण विकासासाठी 60 कोटी रुपये
* तातडीने विकास आराखडे सादर करण्याचे निर्देश
* मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धा आयोजित करणार
नागपूर, दि. 1 : नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शहरात तसेच जिल्ह्यातही विविध खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आहे. खेळाडूंना शहरातील क्रीडांगणावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन चांगले खेळाडू घडविण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी 10 असे 60 क्रीडांगणांचा विकास करण्यासाठी 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.
हैद्राबाद हाऊस येथे शहरातील क्रीडांगण विकासासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, मनपा उपमहापौर दीपराज पार्डीकर, महानगरपालिका आयुक्त रविंद्र ठाकरे, एनआयटीचे मुख्य अभियंता श्री. गुज्जलवार, क्रीडा विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, नागपूर क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण आदी उपस्थित होते.
खासदार चषक क्रीडा स्पर्धा शहरातील विविध 33 मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. यावर्षी खेळाडूंची संख्या व क्रीडा प्रकारामध्ये वाढ करण्यात येत असल्यामुळे या स्पर्धा 35 मैदानांवर आयोजित करण्यात येणार आहे. या मैदानासह विधानसभानिहाय प्रत्येकी 10 मैदाने अशी एकूण 60 मैदानांचा विकास करण्यात येणार आहे.यासोबतच विभागीय क्रीडा संकुल येथे आवश्यक सुविधांसह सॉफ्ट बॉल मैदान विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 6 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
क्रीडांगणांचा विकास करताना प्रत्येक क्रीडांगणावर आवश्यक सुविधा, खेळाडूंसाठी सुविधा आदी खर्चासंबंधीचे प्रस्ताव येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रीडांगणाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करुन नागपूर सुधार प्रन्यासमार्फत क्रींडांगण विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन
ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात तीन दिवसांच्या या स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धा स्थानिक आमदारांच्या नेतृत्वात संपन्न होतील.
मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असून या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी 90 लक्ष रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
** *** **
No comments:
Post a Comment