Monday, 1 October 2018

खेळाच्या माध्यमातून नैपुण्य मिळवा - चंद्रशेखर बावनकुळे

                                * राज्यस्तरीय शालेय जलतरण, वॉटर पोलो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

नागपूर, दि 1 : खेळामध्ये यश किंवा अपयश हे अंतिम नसते. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या सूप्त कलागुणांचा विकास करुन विविध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
        राज्यस्तरीय शालेय जलतरण, वॉटर पोलो क्रीडा स्पर्धा सन 2018-19 चे उद्घाटन आज  अंबाझरी रोड वरील  नागपूर सुधार प्रन्यास जलतरण तलाव येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  
   क्रीडा व युवक संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर, जिल्हा हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय जलतरण, वॉटर पोलो क्रीडा  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही  राज्यस्तरीय स्पर्धा येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नागपूरमध्ये तिसऱ्यांदा राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा होत आहे. 

यावेळी   नागपूर विभागीय क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, नागपूर क्रीडा अधिकारी अविनाश पुंड,  क्रीडांगणाचे अभ्यासक संजय देशपांडे, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धा नागपूर येथे आयोजित करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सूचना केली होती. त्यानुसार क्रीडा विभागाच्या वतीने नागपूर येथे  राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही अभिमानाची बाब आहे.  शासनाच्या वतीने क्रीडा स्पर्धेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यस्तरीय क्रीडा प्रकारासांठी विशेष आग्रही आहे. नागपूर येथे 60 नवीन क्रीडांगणे निवडून त्या प्रत्येक क्रीडांगणाच्या सुसज्जतेसाठी 1 कोटी रूपये देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले आहे.
       क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती वाढीस लागून प्रत्येक स्पर्धक हा खऱ्या अर्थाने विजयी ठरतो. क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या सक्षम तर बनतोच शिवाय अशी व्यक्ती सामाजिक दायित्व देखील योग्य रितीने पार पाडू शकतो, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी  व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. ज्ञानेश ढाकुलकर यांनी तर आभार डॉ. संभाजी भोसले यांनी मानले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नऊ विभागातून  14 वर्षे, 17वर्षे आणि 19 वर्षे या वयोगटातील 954 मुला-मुलींनी  सहभाग घेतला. यावेळी स्पर्धक, त्यांचे मार्गदर्शक, पालक उपस्थित होते.
                                                                        ** * * * **

No comments:

Post a Comment