मुंबई, दि. 31 : सेवा हक्क कायदा हा
नागरिकांना कालमर्यादेत, पारदर्शकपणे सेवेची हमी देणारा
कायदा असून या कायद्याच्या जनजागृतीसाठी युवकांनी स्वत: ‘ब्रॅण्ड
अम्बॅसीडर’ म्हणून काम करावे, असे
आवाहन राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज येथे केले.
चर्चगेट येथील के.सी. विधी
महाविद्यालयात हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्डच्या (एच.एस.एन.सी.बोर्ड) 70
वर्षे पूर्तीनिमित्त महाराष्ट्र सेवा हक्क कायदा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले होते, त्या
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी एच.एस.एन.सी. बोर्डचे
विश्वस्त आणि अध्यक्ष ॲड. अनिल हरिष, के.सी. विधी
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता लालचंदानी, के. सी.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता बागला, राज्य सेवा
हक्क आयोगाचे उपसचिव आण्णासाहेब चव्हाण यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक,
विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. क्षत्रिय म्हणाले, सर्वसामान्य
माणसाला सेवेची हमी देणारा सेवा हक्क कायदा असून या कायद्याविषयी तळागाळापर्यंत
जनजागृती होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आयोगाकडून राज्यभरात काम सुरू आहे.
सुरुवातीच्या 50 सेवांपासून आता 492 सेवा या कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात आल्या
आहेत. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सेवा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे.
त्यादृष्टीने राज्य शासन उत्तम काम करत असून सध्या 392 सेवा ऑनलाईन झाल्या आहेत.
उर्वरित सेवाही ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऑनलाईन सेवांसाठी अत्यंत
सुलभ असे ‘आपले सरकार वेबपोर्टल’ तसेच
आपले ‘सरकार मोबाईल ॲप’ सुध्दा सुरू
करण्यात आले आहे. त्यावर एकदाच नोंदणी केल्यानंतर कितीही वेळा वेगवेगळ्या
सेवांसाठी अर्ज करता येतो.
या कायद्याअंतर्गत आतापर्यंत 18 लाख
नागरिकांनी नोंदणी केली आहे. विविध विभागांच्या सेवांसाठी 6 कोटी अर्ज प्राप्त
झाले आहेत. त्यापैकी जवळपास 5 कोटी 90 लाख अर्जांवर सेवा पुरविण्यात आल्या असून
त्याचे प्रमाण 99 टक्के आहे. एकदा ऑनलाईन दाखले, प्रमाणपत्र आदी सेवा
पुरविण्यात आल्यानंतर त्या डिजीटली साठवून ठेवण्यात येत असल्याने त्याच सेवेसाठी
पुन: पुन: अर्ज करावा लागत नाही. सेवा हक्क कायदा आणि माहितीचा अधिकार हे पूरक
असून त्यामुळे गोपनीयतेला लगाम आणि सेवेत पारदर्शकता याबाबी साध्य झाल्या आहेत,
असेही श्री. क्षत्रिय यांनी सांगितले.
सध्या परदेशात असलेल्या नागरिकांनी
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,
जन्मतारखेचे प्रमाणपत्र यासाठी आपले सरकार पोर्टलवर अर्ज केले आहेत.
त्यांना सेवाही पुरविण्यात आल्या आहेत. हे या कायद्याचे मोठे यश आहे. या
कायद्यामुळे सर्वसामान्य जनतेचा शासकीय कार्यालयात जाणारा वेळ आणि लागणारा पैसा
याची बचत होत आहे. मात्र दुर्गम भागात
इंटरनेटच्या नेटवर्कच्या अडचणी, ऑनलाईन प्रक्रियेच्या
माहितीचा अभावा आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात
ऑफलाईन अर्ज केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करण्याच्या
प्रकियेबाबत शिक्षित व्हावे, यासाठी महाविद्यालयीन युवकांनी
काम करण्याची गरज आहे. राज्यात सध्या 26 हजार आपले सरकार सेवा केंद्रे उत्तमरित्या
काम करत आहेत, असेही श्री. क्षत्रिय म्हणाले.
यावेळी श्री. हरिष यांनी
एच.एस.एन.सी. बोर्डच्या कार्याचा आणि विस्ताराचा आढावा घेतला. सत्तेचा वापर
जनतेच्या कल्याणासाठी करावयाचा असेल तर प्रत्येकाला आपल्या कर्तव्याप्रती जबाबदार
राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.यावेळी डॉ. लालचंदानी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
००००
No comments:
Post a Comment