वस्त्रोद्योग आयुक्तालयाचा खुलासा
नागपूर, दि.29 : राज्य शासनाच्या सहकार वस्त्रोद्योग पणन विभागाच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात संचालनालयाकडून सरळसेवा पदभरतीची कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नसून,व्हॉट्स ॲपवरील जाहिरात ही खोटी असल्याचे वस्त्रोद्योग प्रशासन सहसंचालक एस. एन. कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
वस्त्रोद्योग संचालनालय नागपूर यांच्या स्तरावर लिपिक एकूण जागा 7, वाहनचालक एकूण जागा 7 आणि शिपाई एकूण जागा 11 अशी तिन्ही मिळून या संवर्गांतील 25 पदे भरण्याबाबतची जाहिरात प्रकाशित झाल्याबाबतचा संदेश व्हॉट्स ॲपद्वारे प्रसारित होत आहे. या सर्व जागा विदर्भातील 11 जिल्ह्यासांठी असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय या खोट्या जाहिरातीमध्ये निवडणूक संपल्यानंतर जिल्हानिहाय पदभरती करण्यात येणार असल्याचाही खोटा दावा करण्यात आला आहे. तरी ही जाहिरात खोटी असून, वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर यांच्या स्तरावरुन अशा प्रकारे पदभरती करण्याबाबत संचालनालयास कोणतेही अधिकार नसून, अशी जाहिरात संचालनालय स्तरावरुन प्रसिद्ध करण्यात आली नाही.
तरी सदर खोट्या पदभरतीच्या अनुषंगाने कोणी मध्यस्थी असल्याचा दावा करुन फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी वस्त्रोद्योग संचालनालय, जुने सचिवालय इमारत, जीपीओ समोर सिव्हील लाईन्स, नागपूर-01, दूरध्वनी क्रमांक 0712-2561247, 2526408 आणि directortextiles@ rediffmail.com या वर संपर्क साधण्याचे आवाहन सहसंचालक एस. एन. कदम यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment