नागपूर, दि. 19 : विधानसभा निवडणूकीसाठी येत्या सोमवारी (21 ऑक्टोबर) रोजी मतदान होणार आहे. निवडणुका खुल्या, निर्भय, शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 अन्वये आदेश पारीत केले आहेत.
कलम 144 नुसार मतदानाच्या दिवशी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या आतील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये मते मिळविण्यासाठी प्रचार करता येणार नाही. कोणतेही मतदाराकडे मताची अभियाचना करता येणार नाही. कोणत्याही विशिष्ट उमेदवारास मत न देण्याबद्दल कोणत्याही मतदाराचे मनवळवता येणार नाही. निवडणुकीच्यावेळी मत न देण्याबद्दल कोणत्याही मतदाराचे मन वळवता येणार नाही. निवडणुकीशी संबंधित अशी (शासकीय सूचने व्यतिरिक्त अन्य) कोणत्याही सूचना किंवा खूण प्रदर्शित करता येणार नाही. मतदान केंद्रामध्ये किंवा त्यांच्या प्रवेशदाराजवळ किंवा त्यांच्या आसपासच्या भागातील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाचा तसा ऐकवणारा उपकरण संच वापरता किंवा चालविता येणार नाही. मतदानकेंद्रामध्ये किंवा त्याच्या प्रवेशदाराजवळ किंवा त्यांच्या आसपासच्या भागातील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी चॅनलमध्ये आरडाओरड करणे किंवा गैरशिस्तीने वागता येणार नाही. प्रतिबंधीत क्षेत्रापेक्षा अधिक अंतरावरुन ध्वनीक्षेपक इत्यादीचा वापर केला जात असेल तरीही त्यामुळे मतदानासाठी मतदान केंद्रात येणाऱ्या व्यक्तीला त्रास होत असेल किंवा मतदान केंद्रामध्ये कामावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या किंवा इतर व्यक्तींच्या कामात अडथळा येत असेल तर तो सुद्धा अपराध समजण्यात येईल.
मतदारांना मतदान करण्यास प्रतिबंध करता येणार नाही. हा आदेश 19 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजतापासून ते दिनांक 22 ऑक्टोबर रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नागपूर यांनी कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment