Sunday, 20 October 2019

निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज


4 हजार 412 मतदान केंद्रांवर होणार मतदान
41 लाख 71 हजार 420 मतदार

नागपूर दि. 20 :  महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उद्या सोमवार, दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा तसेच अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी मतदार जागृतीचे विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्र सज्ज झाले आहे.
विधानसभेच्या 12 मतदारसंघात 41 लाख 71 हजार 420 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 21 लाख 34 हजार 932 पुरुष मतदार तर 20 लाख 36 हजार 389 स्त्री मतदार आहेत. तर 99 तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.
मतदानासाठी नागपूर शहरात 2 हजार 49 मतदान केंद्र असून ग्रामीण भागातील 6 विधानसभा मतदारसंघात 2 हजार 363 असे एकूण 4 हजार 412 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. जिल्हयातील 443 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगची सुविधा असून जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातील बचतभवन येथे यासाठी विशेष केंद्र सज्ज झाले आहे.
जिल्हयातील मतदान केंद्रांपैकी 85 मतदान केंद्रांच्या स्थळांमध्ये बदल झाला असून बदललेल्या मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून मतदारांनी बदल झालेल्या मतदान केंद्रावर जावून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
कामठी विधानसभा मतदारसंघातील 27 मतदान केंद्राच्या जागेत बदल झाला आहे. त्यानुसार आधीच्या मतदान केंद्रावर बदललेल्या मतदान केंद्रावर माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 52-नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 5 मतदान केंद्राच्या जागेत बदल झाला आहे. 53-नागपूर दक्षिण मतदारसंघात 9 मतदान केंद्राची जागा, 54-पूर्व नागपूरातील 10 मतदान केंद्र, 56-पश्चिम नागपुरातील 3 मतदान केंद्र, 57-उत्तर नागपूर मधील 13 मतदान केंद्र, 51-उमरेड मधील 2 मतदान केंद्र, 49-सावनेर मधील 3 मतदान केंद्र, तर 59-रामटेक मधील 8 मतदान केंद्राच्या जागेत बदल झाला आहे. मतदान केंद्राच्या बदला संदर्भात तसेच मतदार यादीतील नाव अथवा मतदान केंद्र यासाठी 1950 या हेल्प लाईनद्वारे सुध्दा माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जिल्हयात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक अशा 12 केंद्रांवर संपूर्ण महिला अधिकारी व कर्मचारी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया व व्यवस्था सांभाळणार आहे. सखी मतदान केंद्रांवर संपूर्ण सुविधा उपलब्ध आहे. जिल्हयात 55 क्रिटीकल मतदान केंद्र आहे. तसेच संपूर्ण मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. किमान आवश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा प्रकाश योजना, ब्रेल लिपीतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व सुविधा पुरविण्यात येतील.
आचार संहिते संदर्भात तक्रारी करण्यासाठी सिव्हीजिल ॲपची सुविधा उपलब्ध आहे. मतदारांच्या मदतीसाठी व्होटर हेल्पलाईन 1950 या क्रमांकावर मतदारांना माहिती मिळविता येईल.
मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
            मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील 11 प्रकारच्या आयोगाने ग्राहय केलेल्या ओळखपत्राच्या माध्यमातून मतदारास आपला मतदानाचा हक्क बजावता येईल.
यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहनचालक परवाना, राज्य व केंद्र शासन सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे / टपाल कार्यालयाचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पापुलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांकद्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जाबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्ताऐवज, तसेच आमदार/खासदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड याद्वारे सुध्दा आपला मतदानाचा हक्क बजावता येईल.
मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जावून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
*******



No comments:

Post a Comment