नागपूर, दि. 21 : आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांच्या
समस्या सोडविण्यासाठी बृहद आराखडा तयार करणार असून अनुसूचित जाती व जमातीसाठींच्या
योजनांवर केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध होणारा निधी शंभर टक्के खर्च होण्यासाठी
कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या धर्तीवर कायदा करणार असल्याची माहिती आदिवासी विकास
मंत्री डॉ.नितिन राऊत यांनी विधानपरिषदेत दिली.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना
सदस्य रवींद्र फाटक यांनी मांडली होती.
डॉ.राऊत म्हणाले, अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेणे
सुलभ व्हावे याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतीगृह योजना राबविण्यात
येते. या शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, आहार, आवश्यक
शैक्षणिक साहित्य इ. सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. शासकीय वसतीगृह
प्रवेशाकरिता तसेच स्वयम् योजनेचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात
आली आहे. राज्यात अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी 285 व मुलींसाठी 210 अशी एकूण 495
शासकीय वसतीगृहे कार्यरत आहेत. या वसतीगृहांची एकूण मंजूर क्षमता 58795 इतकी असून
त्यापैकी 53355 विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश देण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त
वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या 20000 संख्येच्या मर्यादेत विद्यार्थ्यांना स्वयम्
योजनेचा लाभ देण्यात येत असून चालू वर्षी त्यापैकी 7119 विद्यार्थ्यांना आतापर्यंत
येाजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे.
सन 2019-20 या शैक्षणिक
वर्षाकरिता डहाणू प्रकल्प कार्यालयांतर्गतच्या 17 वसतीगृहांसाठी एकूण 1849 अर्ज
पात्र ठरले होते. त्यापैकी वसतीगृहाची एकूण मंजूर विद्यार्थी प्रवेश क्षमता 1450 व
वसतीगृहाच्या इमारतींमध्ये जागा उपलब्ध असल्याने वाढीव 100 अशा एकूण 1550
विद्यार्थ्यांना माहे 15 डिसेंबर 2019 पर्यंत प्रवेश देण्यात आलेला आहे. तसेच
स्वयम् योजनेंतर्गत ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर 42 विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर
करण्यात आलेले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज स्वयम् योजनेच्या लाभासाठी
कॉलेज स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित असून कॉलेज स्तरावरुन हे अर्ज त्वरीत निकाली
काढण्यासाठी प्रत्येक कॉलेजसाठी प्रकल्प क्षेत्रातील कर्मचाऱ्याची नियुक्त
करण्याबाबत प्रकल्प अधिकारी, डहाणू यांना
सूचना देण्यात आलेल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांना त्वरीत लाभ देण्याची कार्यवाही
सुरु आहे. तसेच आदिवासी विकास विभागाच्या मदतीने एक आदिवासी विद्यार्थीनी उच्च
शिक्षणासाठी परदेशात गेली असल्याचेही डॉ.राऊत यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य सर्वश्री
डॉ.परिणय फुके, विक्रम काळे, आंबादास दानवे, जोगेंद्र कवाडे, श्रीमती
विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment