Saturday, 1 February 2020

लोकाभिमुख कामातून विभागाचा नावलौकिक वाढवावा - रविंद्र ठाकरे


लेखा व कोषागारे दिन उत्साहात

             नागपूर, दि.1 :  कार्यतत्परता, कार्यक्षमता वाढ आणि पारदर्शकतेच्या जोरावर लेखा व कोषागारे विभाग विशेष ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. यापुढेही लोकाभिमुख कामे करुन विभागाचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले. लेखा व कोषागारे दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.         
             लेखा व कोषागारे संचालनालयाच्या विविध घटकांना एकत्र आणून बंधुत्वाची भावना वाढीस लागावी. तसेच या सेवेच्या माध्यमातून विभागाचा आढावा घेत पुढील प्रगतीला चालना मिळावी. या उद्देशाने आज लेखा व कोषागारे दिन साजरा करण्यात आला.

पोलिस सहआयुक्त नीलेश भरणे, वित्त संचालक बी. व्ही. तांबडे, सहसंचालक विजय कोल्हे, वरिष्ठ कोषागार अधिकारी प्रकाश आकरे, सुवर्णा पांडे, पंजाब नॅशनल बँकेचे शैलेंद्र कुमार, बडोदा बँकेचे अनुपम रवी, बँक ऑफ इंडियाचे विलास पराते, माजी माहिती संचालक श्री. ग. सहस्त्रभोजनी यांची यावेळी उपस्थिती होती.
           वित्त विभागासोबत लेखा व कोषागारे जुळल्यामुळे  विभागास वेगळी ओळख मिळाली असल्याचे सांगून श्री. ठाकरे म्हणाले. विभागाने कार्यशैली आणि कार्यतत्परतेतून प्रतिमानिर्मिती केली असून, ती यापुढे ती वृद्धिंगत करण्यावर भर द्यावा. विभागात काम करताना कार्यमर्यादेवर विशेष भर द्यावा लागतेा. त्यातून कामकाजात वक्तशीरपणा येतो आणि कामकाजाला शिस्त लागते. राज्य शासन  एका विशिष्ट कालावधीनंतर कार्यप्रणालीत नवनवीन बदल स्विकारत असते. एलबीटी जावून आता जीएसटी आल्यामुळे कामात सतत बदल करावे लागतात. अधिकारी-कर्मचाऱ्यांना अद्ययावत राहावे लागते अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच कार्यालयाची क्षमता अवलंबून असते. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या कार्यक्षमतेत सतत वाढ करण्याचे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.
महसूल विभागातून वेगळा झाल्यापासून ते वित्त्‍ा वित्त विभागात लेखा व कोषागारे विभागाने स्वतंत्र प्रतिमा निर्मिती केल्यापर्यंतचा इतिहास संचालक तांबडे यांनी सांगितला. पेन्शनधारकांना वेळेत पेन्शन देणे, वित्तीय पडताळणी करणे, संवर्ग निर्मितीचा उद्देश्य साध्य करणे यातून कार्यालयाचे महत्त्व वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच सैद्धांतिक ज्ञान, प्रात्यक्षिक ज्ञान आणि अनुभव अशा तीन प्रकारच्या स्त्रोतांमधून अधिकारी कर्मचारी यांनी ज्ञानवृद्धी करावी. ज्ञानवृद्धीतून कामे करण्यासाठी प्रयत्नरत राहावे कारण लेखा व कोषागारे हा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण विभाग असून, या विभागाचे स्वतंत्र स्थान असल्याचे  श्री. तांबडे यांनी यावेळी सांगितले.  
            दैनंदिन कामकाजाच्या ताणातून थोडा विरंगुळा मिळावा. कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांत बंधुत्‍व, स्नेहभाव वाढीस लागावा. यासाठी लेखा व कोषागारे दिन साजरा करत असल्याचे सांगून सहसंचालक विजय कोल्हे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
            यावेळी श्री. भरणे, श्री. शैलेंद्र कुमार, श्री. विलास पराते, राजय उत्पादन शुल्क विभागाच्या वित्त अधिकारी दीपाली भरणे, श्री. सहसत्रभोजनी यांचीही समयोचित भाषणे झाली.
            मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विविध विभागातील सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचाऱ्यांचा स्मतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गोसेवाडे यांनी केले तर श्रीमती अबोली कोलनकर यांनी आभार मानले.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी लेखा व कोषागारे दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
***** 

No comments:

Post a Comment