महिला बचत गटांच्या राज्यस्तरीय
प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
· राज्यातील 15
जिल्ह्यांचा सहभाग
· नाबार्डतर्फे
महिला बचत गटांच्या वस्तूंना व्यासपीठ
· आकर्षक जीवनापयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
· खवय्यांसाठी ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांची मेजवानी
नागपूर, दि. 19: राष्ट्रीय कृषी व
ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तसेच उत्कर्ष फाऊंडेशनच्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे राज्यस्तरीय
प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते बजाज नगर येथील
जेरिल लॉन येथे आज करण्यात आले. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद लाभला.
प्रदर्शनाच्या
उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, नाबार्डचे
मुख्य महाव्यवस्थापक यु.डी. शिरसाळकर, एमएसएमईचे संचालक पी.
एम. पार्लेकर, गजेंद्र भारती, नाबार्डच्या
जिल्हा विकास प्रबंधक मैथिली कोवे आदी उपस्थित होत्या.
नाबार्ड ही
जगातली सर्वात मोठी सुक्ष्म वित्त योजना आहे. नाबार्डच्या
माध्यमातून समाजातील गरीबी निर्मूलनाला हातभार लागत असून महिला सक्षमीकरणाचा वेग
मुख्यत्वे ग्रामीण स्तरावर वाढत आहे. यामुळे महिला सशक्तीकरणासाठी नाबार्डच्या
माध्यमातून बचतगटातील महिलांना योग्य व्यासपीठ मिळत असल्याचे प्रतिपादन
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी राज्यस्तरीय प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी
केले.
महिला बचत
गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम राज्यात सुरू आहे. यातून महिलांना
रोजगारही मिळाला असून काही महिला मोठ्या उद्योजिकाही बनल्या आहेत. बचतगटाच्या
माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहे. मात्र ग्रामीण भागातील महिला
मार्केटिंगमध्ये कमी पडतात. त्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या वस्तूंची
जगभरात ओळख करुन देण्याची संधी मिळत आहे. शिवाय ग्राहकांना सर्व प्रकारच्या वस्तू
एकाच छताखाली उपलब्ध होत आहे. सुमारे 60 प्रकारच्या वस्तू बचत
गट, संयुक्त देयता समुह (जेएलजी), ग्रामिण कारागीर निर्मित
कलाकृती, विविध साधन सामुग्री, आकर्षक
जीवनोपयोगी वस्तू विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत. पर्सेस, बांगडया,
विविध प्रकारचे श्रृंगार साहित्य, कपडे,
साड्या, कुर्ते, रेशीम
कापड, रेशीम साड्या तसेच उदबत्ती, धुप
आदी वस्तूंची रेलचेल आहे.
खवय्यांसाठी मेजवानी
प्रदर्शनामध्ये
महाराष्ट्रीय व्यंजन, शाकाहारी तसेच मासांहारी खाद्यपदार्थ
खवय्यांना आकर्षित करीत आहे. विदर्भातील लज्जतदार भाकरी पिठंल, खानदेशाची तांदळाची भाकरी, बेसन, ठेचा, मराठवाड्याची पुरणपोळी, कुसुमवडा,
डाळभात पाणगे सारखे मराठमोळे खाद्यपदार्थ खवय्यांना आमंत्रित करीत
आहे. चिकन पकोडा, फिश फ्राय, चिकन
भाकरी यासारखे मांसाहारी पदार्थ देखील उपलब्ध आहेत. तसेच पापड, शेवया, कुरड्या, मसाल्याचे
पदार्थ, आंबा, लिंबू, हळद, आवळा, कवठ, मिरची, करवंद आदी विविध प्रकारची चविष्ट लोणची
उपलब्ध आहेत. सेद्रिंय पद्धतीने पिकविण्यात आलेली विविध डाळी, शेतमाल उपलब्ध आहे. वर्धा जिल्ह्यातील करंजी काजी येथील स्नेहलता सावरकर
या सेंद्रीय पद्धतीने मशरुमचे उत्पादन घेतात. यामध्ये फ्रेश मशरुम, ड्राय मशरुम पावडर, मशरुम लोणची, चटणी, मशरुम मुगवड्या, मुरंबा
अशी विविधांगी मशरुम उत्पादने घेतात. ग्राहकांकडून सेद्रींय पद्धतीने पिकविण्यात
आलेल्या मशरुम मालाला विशेष मागणी होत असल्याची माहिती श्रीमती सावरकर यांनी दिली.
देशामध्ये जवळपास 1
करोड बचतगट आहेत. या बचतगटाच्या माध्यमातून 30 हजार करोड रुपयांची बचत होते. या
प्रदर्शनात राज्यातील 15 जिल्ह्यातील महिला बचत गट सहभागी झाले आहेत. यासाठी
जिल्ह्यातून 50 तर इतर जिल्ह्यातून 35 महिला बचत गटांनी विविध स्टॉल्स लावले आहेत.
या प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात
जीएसटी, सरकारच्या विविध योजनांनी माहिती, मार्केटिंग, पॅकेजिंगसह अनेक विषयांवर तज्ज्ञांच्या
मार्गदर्शनाखाली कार्यशाळा देखील होणार आहे. प्रदर्शन 23 फेब्रुवारीपर्यंत सुरू
राहणार असून या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन मैथिली
कोवे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment