· शाश्वत योग शेती व समग्र ग्रामीण विकास परिषद
नागपूर, दि.04 : विदर्भातील
शेतकरी सोयाबीन, कापूस, संत्रा अशी प्रमुख पीक
घेतात. शेतक-यांना पिकांच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कीटक नाशके व रासायनिक
खते वापरावर उत्पन्नाचा बराच खर्च होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक
पिकांपेक्षा शाश्वत रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन रेशीम संचालक
भाग्यश्री बानायत यांनी केले. जामठा येथे नुकतीच शाश्वत योगीक शेती व समग्र
ग्रामीण विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून त्या
बोलत होत्या.
रेशीम
शेतीमध्ये तुतीचा पाला रेशीम किटकांना खाद्य म्हणून वापरता येतो. त्यापासून रेशीम
कोषाचे उत्पादन घेता येते. रेशीम शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचे कीटक नाशक व
रासायनिक खतांची आवश्यकता नसते. सद्यस्थितीत राज्यात 20 हजार
शेतकरी रेशीम शेती करीत असून,
रेशीम शेतीमधून शाश्वत
उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून शाश्वत
उत्पन्न घेण्याचे आवाहन त्यांनी शेतक-यांना केले.
सद्यस्थितीत शेती तंत्रज्ञानामध्ये मोठ्या
प्रमाणात बदल घडत असून,
शेतकरी नवनव्या
तंत्रज्ञानाच्या वापरातून दुप्पट उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शासनाचे
धोरणदेखील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रीमती बानायत
यांनी सांगितले. परिषदेला मोठ्या प्रमाणावर शेतकरी, नाबार्ड व प्रशासकिय
अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शाश्वत शेतीच्या विविध पैलूंवर परिषदेत चर्चा
करण्यात आली.
*****
No comments:
Post a Comment