Wednesday, 4 March 2020

करिअर निवडतांना परिश्रम करण्याची तयारी ठेवा - डॉ. संजीव कुमार





* ग्रामीण विद्यार्थ्यांसोबत संवाद
   * कृषी विकास प्रतिष्ठानचा उपक्रम

नागपूर, दि. 4 : करिअर निवडतांना वेळेचे नियोजन व परिश्रम करण्याची तयारी ठेवतानाच मिळालेल्या संधीचा योग्यवेळी  वापर करा.  स्पर्धा परीक्षा ही आपल्या जीवनातील महत्त्वाची संधी आहे. योग्य संधी सोडू नका, असा सल्ला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिला. थडीपवनी येथील कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘स्पर्धा परीक्षेची  गुरुकिल्ली’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून चरणसिंग ठाकूर, कृषी विकास प्रतिष्ठानचे श्रीराम काळे, बंडोपंत उमरकर, ज्येष्ठ संपादक श्रीकृष्ण चांडक, अरुण वानखेडे तसेच विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करिअर निवडतांना आपल्यामधील असलेल्या क्षमता आणि विषयाची आवड याला प्राधान्य देण्याची आवश्यकता व्यक्त करताना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले की, आपल्यामध्ये असलेल्या उच्च क्षमतांकडे दुर्लक्ष करुन समाज अथवा पालक यांनी थोपविलेल्या विषयानुसार निर्णय घेतो. परंतु ज्या क्षेत्रात प्रदीर्घ काम करायचे आहे  त्यामुळे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
पालकांकडून मिळत असलेल्या सुरक्षित वातावरणात न राहता स्वत:मध्ये जिद्द व क्षमता निर्माण करुन डेडिकेशन, कमिटमेंट, हार्डवर्क यासोबतच आपण एक्स्ट्राआर्डनरी आहोत ही भावना निर्माण करण्याचा सल्ला देतानाच कुठल्याही भाषेचा न्यूनगंड न पाळता इंग्रजीसह मातृभाषेसाठी प्राविण्य मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. यासाठी कुठलाही शॉर्टकट स्वीकारु नका, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
जम्मू-काश्मीर प्रांताचे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण पूर्ण करुन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळविल्यानंतर स्पर्धा परीक्षा देवून भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी केलेल्या परिश्रमाबद्दल माहिती देताना  डॉ. संजीव कुमार म्हणाले की, वेळेचे नियोजन तसेच मिळालेल्या संधीचा योग्यवेळी वापर केल्यामुळे या क्षेत्रात संधी उपलब्ध झाली आहे. बदलाचा वेध घेतानाच आपले करिअर निवडणे आवश्यक आहे. पुढील 25 ते 30 वर्षे भारतात विकासाच्या संधी खूप निर्माण होत आहेत.  त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात करिअर  घडविण्याच्या दृष्टीने आपल्यामध्ये क्षमता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्वत:ची स्पर्धा स्वत:सोबत करा, इतरांसोबत तुलना करु नका, मोठा विचार करा आणि तो मिळविण्यासाठी परिश्रमाची तयारी ठेवा, असा सल्ला देतानाच शहरी  आणि  ग्रामीण अशी तुलना न करता ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा मोठे यश संपादन करु शकतात. ही  भावना स्वत:मध्ये निर्माण करा, असेही  विद्यार्थ्यांशी  संवाद साधताना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
प्रारंभी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत राज्य व केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले अभ्यास साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी  या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
चरणसिंग ठाकूर यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले करिअर ठरवावे. यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन अरुण वानखेडे यांनी केले. तर आभार बंडोपंत उमरकर यांनी मानले. या उपक्रमात  कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विभागीय आयुक्तांसोबत विद्यार्थ्यांनी संवाद साधून प्रशासकीय सेवा  पूर्वतयारीबाबत माहिती घेतली.
*****

No comments:

Post a Comment