Monday, 20 April 2020

शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्येही ताजी फळे-भाजीपाला



·         दररोज सरासरी 2 हजार क्विंटल फळे व भाजीपाल्याची विक्री
  • या उपक्रमात 220 उत्पादक गटांचा सहभाग

नागपूर, दि.20 :  कोरोना प्रतिबंधक उपायांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्यही शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला फळे व भाजीपाला शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. नागपूर विभागातील 220 शेतकरी उत्पादक गट दररोज सरासरी दीड ते दोन हजार क्विंटल फळे व भाजीपाल्याची विक्री करीत आहे. यासाठी शेतकरी उत्पादक गटांना विक्रीसाठी 223 जागा निश्चित करुन देण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टसिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे साप्ताहिक बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेसह जिल्हयाच्या प्रमुख ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या गर्दी टाळण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करुन दिल्या आहेत. त्याच जागेवर कृषी विभागाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या नाशवंत मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या फळांसह वांगे, मिरची, टोमॅटोपासून सर्व भाजीपाला व्यापाऱ्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहचविला जातो. परंतु टाळेबंदी लागू असल्यामुळे बाजार समित्या तसेच दैनंदिन भाजी बाजारांवर निर्बंध आले आहे. भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळणे आवश्यक असल्यामुळे विक्रेंदीत स्वरुपात शहरातील मोकळया मैदानावर भाजी व फळे विक्रीसाठी परवानगी दिली आहे. नागपूर शहरात 38 वार्डामध्ये शेतकरी उत्पादक गटामार्फत फळे व भाजी विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे नागपूरसह विभागातून शेतकरी उत्पादक गटामार्फत फळे व भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे नागरिकांना शेतातील ताजी फळे व भाजीपाला उपलब्ध झाला असल्याची माहिती कृषी विभागाचे सहसंचालक रविंद्र भोसले यांनी दिली.
विभागात फळे व भाजीपाला विक्रीसाठी कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत 220 शेतकरी उत्पादक गटांनी लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना ताजी फळे-भाजीपाला उपलब्ध होत आहे. यासाठी 223 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. दररोज सरासरी 31 हजार 504 क्विंटल फळे-भाजीपाल्याचे विक्री होत आहे.
शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून दैनंदिन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या फळे व भाजीपाल्यामध्ये आतापर्यंत नागपूर जिल्हयातील 35 शेतकरी उत्पादक गटांनी 39 ठिकाणी 4 हजार 786 क्विंटल फळे व भाजीपाल्याचे विक्री केली आहे. भंडारा जिल्हयातील 27 गटांमार्फत 22 ठिकाणी 8 हजार 40 क्विंटल, गोंदिया जिल्हयातील 21 गटांनी 15 ठिकाणी 1 हजार 610 क्विंटल, चंद्रपूर जिल्हयातील 78 गटांनी 99 ठिकाणी 11 हजार 112 क्विंटल, गडचिरोली जिल्हा 33 उत्पादक गट 30 ठिकाणी 2 हजार 574 क्विंटल तसेच वर्धा जिल्हयातील 26 शेतकरी उत्पादक गटांमार्फत 18 ठिकाणी विक्री ठिकाणे निश्चित करण्यात आली असून 3 हजार 380 क्विंटल फळे व भाजीपाल्याचे विक्री करण्यात आली आहे.
कृषी उत्पादन बाजार समित्या, आठवडी बाजार तसेच प्रचलित बाजारांच्या माध्यमातून होणारा शेतमाल पुरवठा, वाहतुकदार, हमाल यांच्या उपलब्धतेमुळे विस्कळीत झाला होता. त्यामुळे शेतकरी उत्पादक गट यांच्यामार्फत थेट ग्राहकांपर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी शेतमालाची विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.
*****


No comments:

Post a Comment